भारतीय जनता पक्ष आज 42 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. 6 एप्रिल 1980 रोजी अस्तित्वात आलेल्या भारतीय जनता पक्षानं खूप मोठा पल्ला गाठला आहे. एकेकाळी दोन जागा जिंकणारा हा पक्ष आता पूर्ण बहुमतानं सरकारमध्ये आहे. अशा परिस्थितीत आता हा खास दिवस आणखी खास बनवण्यासाठी पक्षाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदींचे भाषण
यावेळी सर्वात मोठा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण असणार आहे. ते आज सकाळी 10 वाजता भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या संबोधनाशिवाय पक्षानं मोठ्या प्रमाणावर ध्वजारोहणाची तयारी केली आहे. भाजपचे सर्व विभाग, जिल्हे, ठिकठिकाणी ध्वजारोहण होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यात प्रत्येक कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी स्थापना दिनाचे आकर्षण शोभा यात्रा असणार आहे. त्यादृष्टीनेही पक्षाने काही दिवसांपूर्वीच तयारी सुरू केली होती.
प्रथमच शोभा यात्राचं आयोजन
लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक कार्यकर्ता यात सहभागी होणार असल्याचे या शोभा यात्रेबाबत बोललं जात आहे. प्रत्येकाच्या हातात कमळ चिन्ह असलेला झेंडा असेल आणि ते पक्षाच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरतील. पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त 42 वर्षात पहिल्यांदाच भाजप शोभा यात्रा काढत आहे. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी यात सहभागी होऊन आपापल्या जिल्ह्यात, मंडळातही कार्यक्रम आयोजित करावेत, यावर भर देण्यात आला आहे. शोभा यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कार्यकर्ते पक्षाची धोरणे आणि योजना लिहिलेले फलक घेऊन जातील. पक्ष तत्त्वांवर चालतो, असा संदेश जनतेला देण्यासाठी हे आहे.
भाजपच्या मते, यावेळी त्यांचा स्थापना दिवसही खास असणार आहे कारण ते देशभरात सामाजिक न्याय पंधरवडा साजरा करणार आहेत. याअंतर्गत 7 ते 20 एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, केंद्राच्या लोककल्याणकारी योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे कार्यक्रम होणार आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी साजरी होणार असून त्या अनुषंगाने कार्यक्रमही ठेवण्यात येणार आहेत.