पोलीस ठाण्यात जाऊन धिंगाणा घालून पोलिसांना अश्लील शिवीगाळ करणं भंडाऱ्याचे तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांना चांगलंच भोवलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आमदार कारेमोरे यांना अटक करण्यात आली असून त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे.
राजू कारेमोरे यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात जाऊन धिंगाणा घातला होता. तसेच पोलिसांना शिवीगाळही केली होती. आपल्या व्यापारी मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी धिंगाणा घातला होता. याबाबतची वार्ता जिल्ह्यात पसरल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर काल कारेमोरे यांनी माफीही मागितली होती. मात्र, आज पोलिसांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी कारेमोरे यांना अटक केली असून त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे.
कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र हे 31 डिसेंबरच्या रात्री 10 वाजता तुमसरकडे जात होते. सोबत त्यांनी आमदारांच्या घरून 50 लाख रुपयांची रोकड घेतली होती. मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंळाच्या स्टँग रूमच्या बंदोबस्ताकरिता लावण्यात आलेल्या पोलिसांनी कार अडविली. वळण असताना गाडी चालकांना इंडिकेटर का दिले नाही म्हणून पोलिसांनी कारचा पाठलाग केला. त्यानंतर पोलिसांनी आम्हाला अडवून बेदम मारहाण केली. मला आणि अविनाश पटले दोघांनाही मारहाण करून आमच्याजवळील 50 लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चेन पोलिसांनी पळविली, अशी तक्रार यासीम छवारे यांनी मोहाडी पोलिसात दिली होती. तर बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक राणे यांनी देखील पटले आणि धवारे यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांची तक्रार दाखल करून घेत तपास सुरु केला होता.
त्यानंतर कारेमोरे यांनी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना दमदाटी केली होती. पोलिसांना शिवीगाळही केली होती. कारेमोरे यांनी पोलीस ठाण्यात घातलेल्या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले. त्यामुळे अखेर कारेमोरे यांनी जाहीर माफीही मागितली. मात्र, पोलिसांनी कारेमोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांना अखेर आज अटक केली आहे.