अप्रतिम मसाला खिचडी अन् गरमागरम कढि

भुसावळ खाद्य भ्रमंती : 11

ज्यांच गांव सुटल, ते वर्षा दोन वर्षातुन भुसावळला चक्कर टाकत असतात.. बरेच जण मुंबई, पुणे माझ्यासारखे नाशिकला स्थयिक झालेले व इतरही अनेक शहरांमधुन … काही बाय रोड प्रीफर करतात तर काही रेल्वे.. मी मात्र अजुनही रेल्वेनेच.. ती जी काही मजा आहे नं ,ती बाय रोड मध्ये नाही. शिवाय खादाडी हि करता येते..नाशिकहुन तसे साडे तीन तासच लागतात..थांबेही काही जास्त नाहीत…नाशिक सोडल्यावर मनमाड, इथे दहा मिनीट गाडी थांबते..मनमाड स्टेशनवर रेल्वेचा एक स्टाँल आहे..तिथे खेकडा भजी जाम भारी असतात,सोबत तळलेल्या मिरच्या ( अर्धवट कच्याचं, पण प्रवासात हे चालायचचं) एक दोन प्लेट ती भजी घ्यायची व मनमाड सोडतांना ती खायची, मध्ये गाडी थांबतच नाही ..अश्यावेळी म्हणजे नांदगांव वगैरे स्टेशन पास होता होता डब्यात भेळवाल्याची एंट्री होते ,वेताची भलीमोठी टोपली त्यात पिवळसर कुरमुरे, दाणे, फरसाण, बारीक शेव,कांदा,टोमँटो, लिंबु रचलेले ..लिंबु आणि कांद्याच्या वासाने तो ए.सी.चा डबा घमघमायला लागतो,मँनर्स,एटिकेट्सचे पापुद्रे उडायला लागतात,व खणखणीत आवाजात आँर्डर्स सुटायला लागतात..भैय्या एक भेल लगाना ,थोडा तीखा चलेगा ! एका स्टिलच्या उभट वाडग्यात हे मिक्स्चर छानपैकी घुसळुन त्यावर कांदा ,टोमँटो आणि शेवे भुरकवुन वर लिंबु पिळुन ,कागदात गुंडाळलेली भेळ हि आपल्या हातात येते,नुकताच आपण भज्यांचा फन्ना उडवलेला असतो..त्या भेळकडे सौ.ज्या नजरेने पाहते , अस वाटतं कि त्यात ही भेळ जळुन खाक होणार..पण आपण तिकडे लक्ष द्यायच नाही ,उलट तिलाच भेळ आँफर करायची,तीने नाही म्हटल तर उत्तमच! शिवाय रेल्वेचा दिव्य चहा,काँफि हे चालुच असत..अस करत करत जळगांव येत..तिथे गाडी थांबल्या न थांबल्या सारखी थांबते…अस्सल भुसावळकर ते स्टेशन सोडल्यावर थोड्याच वेळात दारात येवुन थांबतो..भुसावळ यायला 15-20 मिनीट अवकाश असतो, पण तरीही हुरहुर थांबत नसते,म्हणुन दाराशी..भुसावळच्या हायवेच्या पुलाखालुन गाडी पास झाल्यावर ,ते इवलस गांव ( आता बरच पसरल तसं ) दिसायला लागत…पण गांव लगेच येत नाही ,गाडी हमखास आउटरला थांबते ,किंवा स्लो होते ,तेवढ्यात त्या परीसरात राहणारे पटापटच उतरतात. स्टेशनवर शिरल्यावर, प्लँटफाँर्मवरचे विक्रते आपल्याला दिसायला लागतात..कुणी समोसे, कटोरी रगडा, तर कुणी ब्रेड आँम्लेट, इडली डोसे ,सँडविच अस सगळ नजरेत भरायला लागत..इथले आँम्लेट तर कमालीचे फ्लपी असते, हिरव्या मिरचीचे हे आँम्लेट खाण्याचा अति मोह होतो पण सौ.आता आपलीच भुर्जी करेल या भितीने आपण तो टाळतो…इथेच एका बाजुला रेल्वेच्या ड्रायव्हरांसाठी रनिंग रुम आहे ..त्यांच एक स्वतंत्र कँटिन आहे. तिथला कडक पराठा व आँम्लेट झकास …घरी पोहोचल्यावर (म्हणजे सासुरवाडीला..) थोड्या गप्पा वगैरे झाल्या नंतर पानावर बसाययं..केळीच्या पानात लाल रंगाची सीमा पार करुन, गडद काळ्या रंगाकडे झुकणारी शेव भाजी , ( प्रायोजक : बोंडे मसाले ) घडीच्या पोळ्या , करकरीत कै-यांच ,उत्तम लालभडक तिखट घातलेल लोणचं , भात असा झकास बेत..सासर जरी कोकणस्थ असल तरी,अस्सल भुसावळकरांप्रमाणे स्वयंपाक मात्र झणझणीत ,( तोच गुण बहुदा सौ. मध्ये आलाय.. असो) एवढ सगळ साग्रसंगीत झाल्यावर झोप अनावर..मग काय निवांत झोप..तरीही संध्याकाळी पावलं नाहाटा काँलेजच्या दिशेने वळायला लागतात. म्हणजे जामनेर रोडवरती, तिथे आता बरेच ढाबे झालेले आहेत पण त्यात महिला बचत गटांचे ढाबे आहेत, हे वैशिष्ठ्य.. महिलांनी उत्तम चालवलेले हे ढाबे ,माझ्यामते एकमेव उदाहरण ! तिथे सुध्दा जेवण हे केळीच्याच पानावर..हिरवगारं भरीत ,ठेचा ,भाकरी ,वरण बट्टी हे तर ठरलेलच ,त्यात बदल नाही..त्यांची मसाला खिचडी तर अप्रतिम..जोडीला कढि..सगळा स्वयंपाक हा चुलीवरचा….दोन -चार माऊल्या , ढाब्याच्या आतल्या भागात चुलीवर, गरमागरम भाक-या बडवित असतात…त्याच आपल्या पानांत अर्ध्या , चतकोर होवुन येत असतात, “मनुमाता” नावाच्या ढाब्यावर याप्रकारचे जेवण , अतिशय रुचकर मिळते,तिथेच ” फौजदारी डाळ ” नावाचा प्रकार मी चाखला होता. उडीद,तूर व हरब-याची दाळ एकत्र शिजवुन , खडे मसाले ,खोबरं घालुन केलेली डाळ जेव्हा आपल्या पानात येते,तेव्हा तो रंग बघुनच आपल्या कानशिलांवर धुरांचा आभास व्हायला लागतो..अशी ही मिश्र डाळ ,भाकरी बरोबर खायची ,तेवढीच भरीत भाकरीला विश्रांती…इथले बिबडे,ज्वारीचे पापडही भलेमोठे व चवीला छान ..जरी हे व्यावसाईक ढाबे असले तरी आदरातिथ्य मात्र अगदी घरच्यासारख ..” बस येकच भाकरी ? काम्हुन ? घ्या नं अजुन येक चतकोर..भाजी आवडली नि का ? मंग घ्या थोडी भाजी..ठेसा वाढु का थोडा ? अस सगळ असतं..उन्हाळ्यात ब-याच जणी माहेरपणाला आलेल्या असतात ,त्या इथे आपल्या सुटलेल्या चवीची भरपाई करतांना दिसतात.. हे जेवण झाल्यावर मस्तपैकी पायी चालत निघाव ..सिंधी काँलनीच्या आसपास आईस्किमची दुकान आहेत तिथल कप दोन कप गुलकंद आईस्क्रिम रिचवावं आणि आता पुरे म्हणुन चालायला लागायच..

© सारंग जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.