जोहान्सबर्ग कसोटीच्या आजच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळावर दक्षिण आफ्रिकेचा दबदबा दिसून आला. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात त्यांनी भारतापेक्षा सरस कामगिरी केली. ज्यावेळी विकेट मिळवण्याची गरज होती, तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन विकेट मिळवल्या व जेव्हा खेळपट्टीवर टिकून फलंदाजी गरजेची होती, तेव्हा तशा पद्धतीची फलंदाजी करुन भारतीय गोलंदाजांना नामोहरम केलं. उद्या कसोटीचा चौथा दिवस असून ही कसोटी निकाली निघणार हे निश्चित आहे. फक्त आजच्या सारखाच खेळ उद्याही आफ्रिकी संघाने दाखवला तर मात्र मालिका पुन्हा बरोबरीत येईल.
अलीकडच्या काही वर्षात भारताच्या बाजूने आहे. त्यामुळे उद्या वाँडर्सच्या मैदानात काय घडणार? त्याची उत्सुक्ता आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 240 धावांच आव्हान दिलं आहे. दिवसअखेर त्यांच्या दोन बाद 118 धावा झाल्या आहेत. त्यामुळे पारडं त्यांच्या बाजूने झुकलेलं आहे.
आज भारताने दोन बाद 85 वरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर सुरुवातीचा तासभर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने अपेक्षा उंचावणारा खेळ केला. पण रहाणे (58) आणि पुजारा (53) धावांवर बाद झाल्यानंतर भारताचा डाव पुन्हा गडगडला. फक्त शार्दुल ठाकूर (28) आणि हनुमा विहारीने नाबाद (40) प्रतिकार केला व भारताची धावसंख्या 266 पर्यंत पोहोचवली. ऋषभ पंतकडून जबाबदार खेळीची अपेक्षा असताना, त्याने तर आपली विकेट बहाल केली. या डावातही फलंदाजीच भारताची डोकेदुखी ठरली. पुजारा आणि रहाणेने अर्धशतक झळकवून टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं असलं तरी, आज स्पेशल खेळीची गरज होती. कारण हे दोघे बाद झाल्यानंतर अन्य फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले.
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात खूप चांगली फलंदाजी केली आहे. मालिकेला सुरुवात झाल्यापासून भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकन फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं आहे. पण आज आफ्रिकन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना दाद दिली नाही. विकेट मिळवण्यासाठी भारतीय गोलंदाजांना संघर्ष करावा लागला. सलामीवीर मार्कराम (31) आणि पीटरसनला (28) अनुक्रमे ठाकूर आणि अश्विनने बाद केले. पण या विकेट सुद्धा सहजासहजी मिळाल्या नाहीत. कॅप्टन एल्गर आणि डुसेची जोडी मैदानावर आहे. आठ विकेट आणि दोन दिवस शिल्लक असल्याने पारडं आफ्रिकेचं जड आहे.