भाजप नेते किरीट सोमय्या हेच अन्वय नाईक यांच्या हत्येला जबाबदार असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केल्यानंतर खुद्द सोमय्या यांनीच आता शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. अँटालिया बॉम्बस्फोट प्रकरणातील मनसुख हिरेन यांच्या हत्येची सुपारी शिवसेनेनेच दिली होती, असा गौप्यस्फोट किरीट सोमय्यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी सचिन वाझे तुरुंगात आहे. तो शिवसेनेचा प्रवक्ता होता, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. सोमय्यांच्या या आरोपाला शिवसेना काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. कोर्लई गावात जात असताना सोमय्या यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा दावा केला.
मनसुख हिरेनची हत्या झाली. सुपारी कुणी दिली? कुणी घेतली? शिवसेनेचा प्रवक्ता सचिन वाझेंनी मनसुख हिरेनच्या हत्येची सुपारी दिली. त्याची पोलीस दलात बेकायदेशीरपणे नियुक्ती केली गेली. सुपारी शिवसेनेने दिली. अशा प्रकारे हत्या होत असेल तर त्याला वाद-विवाद म्हणत नाही. त्याला माफीया सरकारच्या विरोधातील संघर्ष म्हणता येईल, असं किरीट सोमय्या म्हणाले. संजय राऊतांनी बेनामी पार्टनर सुजीत पाटकरला जम्बो कोव्हिड सेंटरचं कंत्राट दिलेच कसे? कंपनीच अस्तित्वात नाही. ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे तरीही त्यांना कंत्राट दिलंच कसं? असा सवाल करतानाच हा वाद नाही, असंही राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या रेवदंडा या सासूरवाडीच्या शेजारच्या कोर्लईगावात पत्नी रश्मी ठाकरेंना 19 बंगले घेऊन दिले. त्याचे पैसे पेड केले. 5 कोटी 18 लाखांचे हे बंगले आहेत. मुख्यमंत्री असताना रश्मी ठाकरेंच्या नावावर हे बंगले करण्यात आले. एवढं सगळं होऊन बंगले नाहीत असं सरपंच म्हणतो. 7 जून 2019ला ग्रामपंचायतीची मिटिंग झाली आणि एक मताने हे बंगले रश्मी ठाकरे यांच्या नावावर करण्याचा निर्णय झाला. याच सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ही मिटिंग झाली होती. प्रॉपर्टी रजिस्टरमध्ये नाव नोंद आहे. जानेवारी 2019मध्ये रश्मी ठाकरेंनी बंगले नावावर करण्यासाठी अर्ज केला आणि आता सरपंच म्हणतात बंगले नाही. हे कसं शक्य आहे? त्यामुळेच या बंगल्यांची पाहणी करायला मी कोर्लईत जात आहे, असं त्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे खोटं बोलू शकत नाही. रश्मी ठाकरे चिटिंग करू शकत नाही. अन्वय नाईक चिटिंग करू शकत नाही. मृत माणसाच्या नावावर उद्धव ठाकरे खोटं बोलणार नाहीत. 2008मध्ये अन्वय नाईकने बंगले बांधले. उद्धव ठाकरेंना एप्रिल 2014ला विकले. म्हणूनच रश्मी ठाकरेंनी अर्ज केला आणि आता सरपंच बंगले नाहीत म्हणून सांगत आहेत. मग बंगले कुणी चोरले की तोडले? त्याचा तपास व्हायला हवा. मुख्यमंत्र्यांसाठी मी मोदींशीही बोलायला तयार आहे. गरज पडली तर महाराष्ट्राच्या पोलिसांच्या मदतीला सीबीआय द्या. पण मुख्यमंत्र्यांचे बंगले शोधलेच पाहिजे, असंही ते म्हणाले.