भुसावळ खाद्यभ्रमंती : 6. भुसावळचे आत्तापर्यंतचे लिखाण वाचुन कोणाला वाटेल ,हे घरी काही करतात कि नाही. तस नाहीये..भुसावळरांच्या पानात देखील भरपुर श्रीमंती असते… भरीत,ठेचा,दाळगंडोरी,कळण्याची भाकरी व हिरव्या मिरचीची दाण्याची चटणी,शेवभाजी,साधं वरण भात व आंबटचुक्याची भाजी,गोडं वरण ,झालच तर कढी ( हि मात्र गोड नसते) पोकळा,मेथी यांची पातळ किंवा सुकी भाजी,दाण्याचं कुट लावुन केलेली हिरव्या मिरचीच्या चवळीच्या किंवा गवारीच्या शेंगा (पानात वाढल्यावर मात्र त्यावर वरुन शेंगदाण्याच तेल ),मसाल्याची खिचडी..सोबत बिबड्या,ज्वारी किंवा उडदाचा पापड असा फर्मास बेत असतो..संध्याकाळी मसाल्याची खिचडी व बिबड्या,लोणचं.. हे तर कंपलसरीच जणु. यातील बिबड्यांचे पापड हा अतिशय चविष्ठ प्रकार..खायला जितका चांगला तितका करायला मेहनतीचा..एकट्याचे हे काम नव्हे..ज्वारी ,गहु,तांदुळ हे चार पाच दिवस भिजत घालायचे,त्याच पाणी रोज बदलायचे नंतर ते वाटुन त्याचा चीक काढायचा व तो पापड करायच्या दिवशी एका मोठ्या पितळेच्या पातेल्यात शिजवायचा,शिजवतांना त्यात हिरवी,पिवळी मिरची,लसुण याचा ठेचा व जोडीला जीरे,तीळ वगैरे घालायचे…त्याला घाटा असे म्हणतात.एवढ्या सा-या कुटाण्यासााठी मदत हि लागणारच..मग शेजारच्या माऊलींना ,त्यांच्या मैत्रीणींना ,जवळपास असलेल्या नणंद,भावजया ,वहीन्या अस झाडुन सगळ्यांना बोलावल जायच..हा सगळा कार्यक्रम सुर्य डोक्यावर यायच्या आत करावा लागायचा,त्यासाठी मग गल्लांमध्येच एकाला एक अश्या खाटा जोडल्या जायच्या ,त्यावर सुती साड्या अंथरल्या जायच्या..हे सर्व होईस्तोवर घाटा शिजत आलेला असायचा… मग त्या पातेल्यातुन पळीपळीनेे तो घाटा ,पोळपाटावर मांडलेल्या ओल्या कपड्यावर घ्यायचा व थोडासा जाडसरच ,पण चांगला गोलाकार आकारात थापायचा..थापल्यावर तो पापड त्या खाटेवर अंथरलेल्या साडीवर टाकायचा..या सगळ्यात लहान काय मोठे काय सर्वांचा डोऴा ओल्या घाटावर असायचा..त्यावर कच्च तेल टाकुन ते गोळे मटकविणे हा एक स्वतंत्र कार्यक्रम चालालेला असायचा..साघारण सकाळी 10 पर्यंत हे आटपायचे..त्यानंतर पुढची कामगिरी म्हणजे बिबड्या वाळविण्याची ,ती कामगिरी सुर्यनारायणावर सोपविली जायची..आणि ती तो चोख पाडायचा कारण त्याच भुसावळ वर प्रेम अतीच..48 डिग्री तापमानात बिबड्या ह्या संध्याकाळपर्यंत वाळुन कडक व्हायच्या..मग त्या साड्या उलटवायच्या त्यावर पाण्याचा शिडकाव करायचा व अलगद हाताने त्या बिबड्या काढायच्या ..सकाळी मदतीला आलेल्या प्रत्येक माऊलींच्या घरी पाच दहा बिबड्यांची चळत हि चुकता पोहोच व्हायची..दुस-या दिवशी त्या बिबड्या परत वाळवायच्या आणि ते वाळवण नीट मोठ्ठाल्या डब्यात भरुन ठेवायच..हि बिबडी कढी आणि खिचडीबरोबर खाणे म्हणजे स्वर्गसुख..त्यावर कच्चे तेल व दाणे घालुन सुध्दा छान लागते ,अश्याच प्रकारे ज्वारीच पापडसुध्दा केले जायचे..लसुण घातलेले उडीद ,मुगाचे पापड हेदेखील सुंदर..ते लाटायला देखील सर्व जणी आपआपले पोळपाट लाटणे घेवुन घरोघरी जायच्या,लाटुन झाल्यावर यजमानीण बाई प्रत्येकिला पाच सहा पापडाच्या लाट्या बरोबर देणारच.. …तिथल्या हातशेवया हिसुध्दा वेगळीच खासियत ..बराच लांब असा पाट तिरपा करुन त्यावर ह्या शेवया करायला कैक वर्षांचे अनुभव असलेले हात लागायचे..बर हे सर्व पदार्थ हे गल्लीतच केले जायचे ..त्यावेळेस धुळ..ऊन..गर्दी वगैरे विचारही कोणाला शिवुन जात नसत..याचप्रमाणे बाजारात कै-या आल्या कि लोणच घालण्याचा बेत ठरायचा,त्यासाठी अडकित्याचा शोध ..कारण वर्षातुन एकदाच लागणारी की वस्तु ती विकत घेण्याकडे कल नसायचा ,गल्लीत एक दोघांकडेच तो असायचा,तो आणला कि पोराटोरांना फोडायला बसवले जायचे , कोणाच्याही घरच्या कोणीही फोडायच..प्रत्येक घराचा लोणच्याच्या मसाला हा वेगळा असायचा,( केप्र,बेडेकर,प्रविण यांची चलती फारशी नव्हती)त्यामुळे अनेक प्रकारची लोणची चाखायला मिळायची कारण घरोघरी त्याची देवाणघेवाण व्हायची…आता इथेच थांबाव हे उत्तम..जमल तर भेटुयात पुढच्या भागात…
तळटिप : बिबड्या करण्याची पध्दत हे फार वरवर लिहिलय..हिच रेसिपी मानु नये..ते सुगरणींच काम आहे..नाहीतर यावर कमेंट्स यायचे..
©सारंग जाधव