केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. 7 व्या वेतन आयोगानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांना 8 व्या वेतनाचाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. 2016 मध्ये सरकारने 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली. त्यानंतर आता 5 वर्षांनी 8 व्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याशिवाय यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा नवा फॉर्म्युला ठरणार असल्याच्याही चर्चा आहेत. यानुसार अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गोष्टींच्या वाढत्या किमतीच्या प्रमाणात पगारवाढ करण्याचा विचार होत आहे.
देशात 8 वा वेतन आयोग आणि पगार वाढीच्या नव्या फॉर्म्युल्याची चर्चा असली तरी सरकारी पातळीवर यापैकी कशावरही अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, घराच्या किमती आणि राहण्याचा खर्चाचा या फॉर्म्युल्यात प्रामुख्याने विचार होणार आहे. तसेच दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचीही जोरदार चर्चा आहे.
केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी ज्या फॉर्म्युल्याची चर्चा आहे त्याचं नाव आहे ‘Aykroyd Formula’. या फॉर्म्युल्यात कर्मचाऱ्यांच्या पगाराला महागाई, राहण्याचा खर्च आणि कार्यालयातील कामाचा परफॉर्मन्स असं एकत्रित बघितलं जातं. यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी हा फॉर्म्युला चांगला असल्याचं म्हटलंय, मात्र त्यावर अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचं म्हटलं. तसेच 8 व्या वेतन आयोगाचीही कोणतीही चर्चा नसल्याचं सांगण्यात आलंय.
केंद्र सरकारने 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारुन त्यांची अंमलबजावणी केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांचं कमीत कमी वेतन 7 हजार रुपयांवरुन 18 हजार झालं. या आयोगाचे प्रमुख न्यायमूर्ती माथुर यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार महागाई आणि इतर निकषांनुसार दरवर्षी वाढवण्याचीही शिफारस केली होती. मात्र, यावर केंद्र सरकारने अधिकृतपणे काहीही निर्णय घेतलेला नाही.