पत्नी व मुलीची हत्या करून पतीने राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना येवदा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भामोद येथे उघडकीस आली आहे. ज्या गावात साधी चोरीचीही घटना सहसा घडत नाही, त्या गावात दुहेरी हत्याकांडासह केलेल्या आत्महत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पत्नी व मुलीच्या मृतदेहाला दुर्गंधी सुटल्याने ही घटना उघडकीस आली. अनिल दिनकरराव देशमुख असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे, तर वंदना अनिल देशमुख व साक्षी अनिल देशमुख असे हत्या झालेल्या पत्नी व मुलीचे नाव आहे.
देशमुख यांच्या घरातून शुक्रवारपासून दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी येवदा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता, एका खोलीतील कपाटामध्ये पत्नीचा, तर दिवाणाखाली मुलगी साक्षीचा कुजलेल्या अवस्थेत, तर दुसऱ्या खोलीत अनिलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
नागरिकांनी अनिल याला नुकतेच गावात पाहिले होते. त्यामुळे त्याने आधी पत्नी व मुलीची हत्या केल्यानंतर रात्री आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मृतक अनिल याच्याकडे लोडींग वाहन होते, परंतु मागील वर्षभरापासून कोरोनामुळे तेदेखील बंद होते. त्यामुळे तो आर्थिक विवंचनेत होता. घटनेचा पुढील तपास येवदा पोलीस करीत आहेत.