आज दि.३ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

महाराष्ट्रात शेतकऱ्यांसमोर
दुबार पेरणीचे संकट

महाराष्ट्रासह मध्य भारतातील बहुतांश भाग आणि उत्तर-पश्चिम भागातील राज्यांमध्ये सध्या पावसाने दडी मारली असताना मोसमी पावसाचा देशातील प्रवास राजधानी दिल्ली आणि जवळच्या राज्यांतच रखडला आहे. गेल्या १४ ते १५ दिवसांपासून त्याने कोणतीही प्रगती केलेली नाही. आणखी पाच ते सहा दिवस तो रखडण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रात आणखी आठ दिवस तरी मोठा पाऊस होणार नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. परिणामी पीक-पाण्याच्या चिंतेत भर पडली आहे.

४१ सहकारी साखर कारखाने अत्यल्प
किमतीला विकल्याची माहिती

ईडीकडून जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणाची जोरदार चौकशी सुरु असून आता काही नवे आरोप केले जात आहेत. महाराष्ट्रातले इतर ४१ सहकारी साखर कारखानेसुद्धा अत्यल्प किमतीला विकल्याचं सांगितलं जात आहे. हे साखर कारखाने महाराष्ट्र सरकार आणि राज्य सहकारी बँकेने २००८-२०१४ या वर्षांमध्ये प्रत्येकी ५ कोटी ते ६५ कोटी रुपयांना विकले आहेत.

विद्यार्थ्यांची तीन वर्षाची कामगीरी
पाहून बारावीचा निकाल देणार

केंद्रीय मंडळांच्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्याही बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता मूल्यमापनाचे सूत्रही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाप्रमाणेच (सीबीएसई) कायम ठेवण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना दहावीच्या राज्य मंडळाच्या परीक्षेतील सर्वोत्तम गुण मिळालेल्या तीन विषयांचे गुण, अकरावीचे गुण आणि बारावीच्या वर्षांतील चाचण्या, प्रकल्प आणि प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा यांआधारे मूल्यमापन करण्यात येणार आहे. निकाल जाहीर करण्याची नियमावली स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

राज्य सरकारने मागितले केंद्राकडे
आणखी दीड कोटी डोस

केंद्र सरकारने जुलै महिन्यात महाराष्ट्राला १ कोटी १५ लाख लसींचे डोस देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र लसीकरणाची महाराष्ट्राची क्षमता व नियोजन लक्षात घेता राज्याला अधिकचे दीड कोटी डोस देण्याची मागणी आरोग्य विभागाने २ जुलै रोजी एका पत्राद्वारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे.

बंडातात्याना ताब्यात घेऊन
काय मिळवले : फडणवीस

सरकारच्या आदेशाला न जुमानता पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. बंडातात्या यांना ताब्यात घेऊन काय मिळवले असा सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान, आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये २३ जण करोनाबाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाले.

माझ्यावर गुन्हा दाखल करताना सीबीआयने
कायद्याला बगल दिली : अनिल देशमुख

आपल्या देशात प्रत्येक नागरिकाला कायदेशीर हक्क मिळतात. २६/११च्या हल्लय़ातील मुख्य आरोपी कसाबलाही कायद्याचा लाभ मिळाला होता. परंतु माझ्यावर गुन्हा दाखल करताना सीबीआयने कायद्याला बगल दिली असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातर्फे उच्च न्यायालयात करण्यात आला. सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी देशमुख यांच्यावतीने अ‍ॅड्. अमित देसाई यांच्या वतीने युक्तिवाद केला आहे.

आमिर खान आणि किरण राव
यांनी घेतला घटस्फोट

बॉलिवूडचा मिस्टर परफेश्कनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव विभक्त झाले आहेत. दोघांनी देखील एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला असून स्वत: आमिर खानने घटस्फोटाची माहिती दिली आहे. आमिर खान आणि किरण रावने अधिकृतरित्या एक स्टेटमेंट जारी करत विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. आमिर किरण १५ वर्षांपूर्वी लग्न बंधनात अडकले होते. दोघांनीही आझाद नावाचा एक मुलगा आहे.

ईडीने जप्त केली डिनो मोरियाची
कोट्यावधी रुपयांची संपत्ती

अभिनेत्री यामी गौतमला ईडीने समन्स बजावल्यानंतर आता अभिनेता डिनो मोरिया ईडीच्या रडावर आला आहे. ईडीने डिनो मोरियाची कोट्यावधी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. डिनो मोरियासोबतच कॉग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता संजय खान आणि डीजे अकील यांच्या संपत्तीवरही ईडीने कारवाई केली आहे. बँकेची फसवणूक आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केलीय.

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील
अभिनेत्याला विनयभंगप्रकरणी अटक

नुकतीच टेलिव्हीजन अभिनेता पर्ल वी पुरीला पोलिसांनी अटक केली होती. एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा पर्लवर आरोप. अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच आता टेलिव्हिजन जगातातून आणखी एक धक्कादाखक बातमी समोर आलीय. एकता कपूरच्या लोकप्रिय ठरलेल्या ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून टीव्ही जगतात पदार्पण केलेला अभिनेता प्राचीन चौहानला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपात प्राचीनला मालाड पोलिसांनी अटक केली आहे.

युरो चषक स्पर्धेत इटली,
स्पेन हे संघ सेमीफायनलमध्ये

युरोपियन देशांत सर्वांत मानाची फुटबॉल स्पर्धा असणाऱ्या युरो चषक (Euro Cup 2020) स्पर्धेत आतापर्यंत सर्वच सामने चुरशीचे झाले असून आता स्पर्धा अंतिम टप्प्य़ात पोहोचली आहे. उपांत्य पूर्व फेरीचे दोन सामने झाले असून इटली आणि स्पेन हे दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. इटलीने झालेल्या सामन्यात बेल्जियमला 2-1 च्या फरकाने नमवत सेमीफायनल गाठली आहे. सुरुवातीपासून नावाला साजेशी खेळी करत इटलीच्या संघाने युरो चषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.