बोगस वेबसाईट तयार करून तुळजाभवानी भक्तांची फसवणूक

राज्य सरकारने मंदिर उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातल्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुळजाभवानीची बनावट वेबसाईट तयार करुन भक्तांना गंडा घातला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीच्या भक्तांना फसवण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

तुळजाभवानी मंदिराची www.shrituljabhavani.org ही अधिकृत वेबसाईट आहे. अज्ञात भामट्यानं www.tuljabhavani.in या नावानं बोगस वेबसाईट सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. या वेबसाईटवरून तुळजाभवानी दर्शन, अभिषेक, प्रसाद, पूजा, जागरण गोंधळ यासाठी भक्तांकडून पैसे वसूल केले जात आहेत.

इंटरनेटवर तुळजाभवानी टेम्पल असा सर्च केल्यावर विकीपिडीयामध्ये जी माहिती उपलब्ध होते, त्यामध्ये याच बोगस वेबसाईटची लिंक देण्यात आली. त्यामुळं भक्तांची जास्त फसवणूक होत असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत उस्मानाबाद जिल्हाधिका-यांकडे रीतसर तक्रार करूनही प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यानं केला आहे.

या प्रकरणी जिल्हाधिका-यांनी कनिष्ठ अधिका-यांवर जबाबदारी ढकलल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, तुळजाभवानीच्या नावे एक नव्हे तर चार चार बोगस वेबसाईट सुरु असल्याची आणखी धक्कादायक माहिती समोर आली. याबाबतचे अहवाल सायबर पोलिसांकडे देण्यात येईल, असं तहसीलदार रोहन शिंदे यांनी सांगितलं.

धक्कादायक बाब म्हणजे तुळजाभवानी मंदिर संस्थान याबाबत काहीच बोलायला तयार नाही. त्यामुळं या प्रकरणातला संशय आणखी वाढला आहे. तेव्हा तुळजाभवानीच्या भक्तांनो, खरी आणि बोगस वेबसाईट वेळीच ओळखा आणि सत्पात्री दान करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.