अमेरिकी काँग्रेसचे भारतीय वंशाचे सदस्य रो (रोहन) खन्ना हे कॅलिफोर्नियातून सेनेटवर निवडून जाण्यासाठी प्रयत्नरत असल्याची माहिती खन्ना यांनी दिली आहे. खन्ना यांचा हेतू भविष्यात राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याचा आहे, अशी चर्चा वेगवेगळय़ा राज्यांतील डेमोक्रॅट सदस्यांमध्ये आहे.
४६ वर्षीय खन्ना यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, २०२८ मधील किंवा त्यानंतरची अध्यक्षीय निवडणूक लढण्याचा पर्याय खन्ना यांच्यासाठी खुला आहे. पण त्यांच्या नजीकच्या काही लोकांच्या मतानुसार, जर विद्यमान अध्यक्ष जो बायडेन (वय ८० वर्षे) ही निवडणूक लढण्यास उत्सुक नसतील, तर २०२४ मध्येच खन्ना स्पर्धेत असतील. पॉलिटिको या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
खन्ना हे कॅलिफोर्नियाच्या सतराव्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टचे २०१७ पासून प्रतिनिधित्व करीत आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याच्या शक्यतेचा त्यांनी स्वत: मात्र इन्कार केला आहे. पण २०२२ च्या आधी आणि नंतरच्या प्रचारसत्रात खन्ना यांनी त्यांचा जिल्हा असलेल्या सिलिकॉन व्हॅली आणि संभाव्य सेनेट मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर निधी खर्च केला आहे.
सेज स्ट्रॅटेजीजचे स्टॅसी वॉकर म्हणाले की, आयओवामध्ये खन्ना यांनी अनेक हेतूंनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यापैकी एक अध्यक्षीय निवडणुकीची तयारी हा असू शकतो.