कोरोनाचं संकट वाढत असून ओमिक्रॉनचाही फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इलाहाबाद हायकोर्टाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी वर्षी होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्याचे आवाहन केलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील निवडणुका पुढे जाण्याची शक्यता असतानाच राज्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. आज विधानसभेतही त्याबाबतची चर्चा झाली. शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनी तर उत्तर प्रदेशातील निवडणुका पुढे ढकलण्याची सूचना कोर्टाने पंतप्रधानांना केली आहे. निवडणूक आयोगाने तसा निर्णय घेतला तर महाराष्ट्रातही निवडणूक आयोगाला असाच निर्णय घ्यावा लागेल असं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातही निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
सुनील प्रभू यांनी एका चर्चे दरम्यान विधानसभेत हे विधान केलं. ओमिक्रॉनचे रुग्ण उत्तर प्रदेशात वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात अशी सूचना इलाहाबाद कोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. ही परिस्थिती पाहून निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावा लागणार आहे. निवडणूक पुढे ढकला जाऊ शकते का याबाबत भविष्य मी करणार नाही, करू शकत नाही. पण महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले तर निवडणूक आयोगाला समान निर्णय घ्यावा लागेल, असं प्रभू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुका पुढे ढकलल्या जाणार असल्याची चर्चा आहे.
राज्यात मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिकेसह 22 महापालिकांची निवडणूक होणार आहेत. त्याशिवाय ग्रामपंचायती आणि नगर परिषदांच्याही निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र, देशावर कोरोना आणि ओमिक्रॉनचं संकट वाढल्याने या निवडणुकाही पुढे ढकलल्या जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
महापालिकांची मुदत कधी संपणार?
मुंबई महापालिका- 7 मार्च 2022 रोजी संपणार आहे.
ठाणे महापालिका- 5 मे 2022 रोजी मुदत संपत आहे.
नवी मुंबई महापालिका- 8 मे 2020 रोजी मुदत संपली आहे.
पनवेल महापालिका- 9 जुलै 2022 रोजी संपणार आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका- 10 नोव्हेंबर 2020 रोजी मुदत संपली आहे.
भिवंडी-निजामपूर महापालिका – 8 जून 2022 रोजी मुदत संपते आहे.
उल्हासनगर महापालिका – 4 एप्रिल 2021 रोजी मुदत संपत आहे.
मीरा-भाईंदर महापालिका – 27 ऑगस्ट 2022 रोजी मुदत संपत आहे.
वसई-विरार महापालिका- 27 जून 2020 रोजी मुदत संपली
पुणे महापालिका- 14 मार्च 2022 रोजी मुदत संपणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका- 13 मार्च 2022 रोजी मुदत संपणार आहे.
नाशिक महापालिका- 14 मार्च 2022 रोजी या महापालिकेची मुदत संपणार आहे.
मालेगाव महापालिका – 13 जून 2022 रोजी मुदत संपत आहे.
धुळे महापालिका – 30 डिसेंबर 2023 रोजी मुदत संपत आहे.
जळगाव महापालिका – 17 सप्टेंबर 2023 रोजी मुदत संपत आहे.
अहमदनगर महापालिका – 27 डिसेंबर 2023 रोजी मुदत संपत आहे.
औरंगाबाद महापालिका- 28 एप्रिल 2020 रोजीच संपली आहे.
परभणी महापालिका – 15 मे 2022 रोजी मुदत संपत आहे.
नांदेड महापालिका – 31 ऑक्टोबर 2022 रोजी मुदत संपत आहे.
लातूर महापालिका – 21 मे 2022 रोजी मुदत संपत आहे.
नागपूर महापालिका- 4 मार्च 2022 रोजी मुदत संपणार आहे.
अमरावती महापालिका – 8 मार्च 2022 रोजी मुदत संपत आहे.
चंद्रपूर महापालिका – 28 मे 2022 रोजी मुदत संपत आहे.
अकोला महापालिका – 8 मार्च 2022 रोजी मुदत संपत आहे.
कोल्हापूर महापालिका- 15 नोव्हेंबर 2020 रोजी मुदत संपली आहे.
सोलापूर महापालिका – 7 मार्च 2022 रोजी मुदत संपत आहे.
सांगली-मिरज महापालिका – 19 ऑगस्ट 2023 रोजी मुदत संपत आहे.