‘हिंदुहृदयसम्राट’ म्हटले की आपल्या डोळ्यासमोर केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच नाव येतं. भाजपने असा बनावट ‘हिंदुहृदयसम्राट’ बनविण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनीच तो डाव हाणून पाडला. भाजपने आता ‘हिंदुहृदयसम्राट’ यांच्या नावांमध्ये जनाब लावण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचा नकली बुरखा फाडायलाच पाहिजे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलीय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांनी काही दिवसांपूर्वी पोस्टर्स झळकावून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख ‘हिंदुहृदयसम्राट’ असा केला होता. राज ठाकरे यांनी त्याचवेळी आपल्या मनसैनिकांना ‘हिंदुहृदयसम्राट’ केवळ एकच आहेत. पुन्हा असे प्रकार करू नका असे बजावले होते.
तर, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आघाडी सरकार यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच, हिंदुत्वाच्या मुद्यावरूनही शिवसेनेवर टीका केली होती. राज ठाकरे यांच्या भाषणाला भाजपणे समर्थन दिले तर, आघाडीच्या नेत्यांनी मनसे ही भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप केला होता.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने देशात एक बनावट ‘हिंदुहृदयसम्राट’ बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो लोकांनी हाणून पाडला.
हिंदू अडचणीत असताना ‘हिंदुहृदयसम्राट’ मदतीला धावत असत. पण, लोक अडचणीत असताना तुम्ही घरी बसणार आणि सगळं सुरळीत झालं की समोर येणार. मीडियाला प्रतिक्रिया देणार. हे केवळ प्रतिक्रिया सम्राट होऊ शकतात, असा टोला या सभेत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
भाजपचे ‘हिंदुहृदयसम्राट’ यांच्यावर जर इतकेच प्रेम आहे तर नवी मुंबई येथील विमानतळाला नाव देण्यासाठी का विरोध केला. समृद्धी महामार्गालाही ‘हिंदुहृदयसम्राट’ बाळासाहेब ठाकरे हे नाव आघाडी सरकारनेच दिलंय याचा विसर पडला का? असा सवाल करतानाच त्या बनावट ‘हिंदुहृदयसम्राट’ याला लोकांनी झिडकारलंय असा टोला लगावला.