पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी आयसीसीच्या बैठकीत चौरंगी क्रिकेट मालिकेबाबत प्रस्ताव ठेवला होता. यावेळेस बीसीसीआयचे अधिकारीही उपस्थित होते. पण राजा यांचा चौरंगी मालिकेबाबतचा हा प्रस्ताव आयसीसीने फेटाळला आहे.
सध्याच्या आयसीसीच्या नियमांनुसार, एक सदस्य मंडळ जास्तीत जास्त तिरंगी मालिकेचं आयोजन करू शकतं. त्यापेक्षा अधिक देशांच्या स्पर्धा आयोजित करण्याचा अधिकार हा फक्त आयसीसीलाच आहे. त्यामुळे आयसीसीने हा प्रस्ताव फेटाळला आहे. आयसीसीच्या या निर्णयामुळे भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये मालिका होण्याच्या शक्यतेलाही पूर्णविराम लागला आहे.
राजा यांनी आयसीसीसमोर चार देशांच्या वार्षिक T20 किंवा एकदिवसीय स्पर्धेसाठी श्वेतपत्रिका तयार केली होती. ज्यामध्ये पाकिस्तान, भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या 4 टीमचा समावेश होता. राजा यांना असा विश्वास आहे की, पाच वर्षांत जवळपास 57 अब्ज रुपयांचा फायदा होऊ शकतो, ज्यातील मोठा हिस्सा या चार देशांना दिला जाऊ शकतो.
इंग्लंड क्रिकेट बोर्ड चे टॉम हॅरिसन देखील चार देशांच्या स्पर्धेच्या योजनांवर स्वतंत्रपणे विचार करण्यास इच्छुक असल्याचं वृत्त होतं. मात्र आयसीसीच्या बैठकीत हा विषय पुढे गेला नाही.
बीसीसीआयनेही याआधीही चौरंगी मालिकेत खेळण्यासाठी रस दाखवला नव्हता. तसेच आाताही खेळणार नसल्याची भूमिका बीसीसायने स्पष्ट केली. आशिया कप आणि वर्ल्ड कपमध्येच टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांचा सामना होतो.