गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाचे दर सातत्याने वाढत असल्याने भारतामध्येही त्याचे पडसाद उमटणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, मंगळवारी सलग नवव्या दिवशी भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. भारताने मुक्त बाजारपेठेचे धोरण स्वीकारल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठे आणि परदेशी एक्स्चेंजच्या दरांनुसार भारतात इंधनाचे दर निश्चित केले जातात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या दरात वाढ झाल्यास भारतामध्येही त्याचा परिणाम होणे, क्रमप्राप्त आहे.
गेल्या आठ दिवसांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.26 रुपये तर एका लीटल डिझेलसाठी 96.19 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 आणि 88.62 रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.