नाशिक महापालिकेने महाराष्ट्रातील सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट उभारला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. खरे तर महापालिकेकडे केवळ 13 मेट्रीक टन ऑक्सिजनची क्षमता होती. मात्र, आता पालिकेने तब्बल 3 कोटी रुपये खर्चून 140 मेट्रीक टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे सबंध उत्तर महाराष्ट्राची चिंता मिटल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
नाशिकमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा विस्फोट झाला असून, बाधितांची संख्या चक्क पाच हजारांच्या पल्याड गेलीय. त्यात सर्वाधिक बाधित नाशिक महापालिका क्षेत्रात 3 हजार 955 आहेत. सोबत निफाड, दिंडोरी आणि सिन्नरमध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे समोर येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 5 हजार 735 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 5 हजार 344 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 765 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांसाठी त्यांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी मोठी धडपड करावी लागली. ऑक्सिजनविना अनेकांचे प्राण गेले. हेच ध्यानात घेऊन नाशिक महापालिकेने ऑक्सिजनमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी टाकलेले पाऊल नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल.
महापालिकेने उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटबाबत माहिती देताना महापालिका आयुक्त कैलास जाधव म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांना पुरवठा केला जाऊ शकतो इतका मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिक महानगरपालिकेने उभारला आहे. पालिकेकडे यापूर्वी केवळ तेरा मेट्रीक टन इतक्या ऑक्सिनची क्षमता होती. मात्र, आता पालिकेने तब्बल तीन कोटी रुपये खर्च करून 140 मेट्रीक टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा सरकारी ऑक्सिजन प्लांट आहे. यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रालाही ऑक्सिनज पुरवठा करू शकेल, असा दावा यावेळी महापालिका आयुक्तांनी केला.
नाशिकमध्ये महापालिकेने ऑक्सिजनची चोख व्यवस्था केली आहे. दररोज 4000 मेट्रीक टन ऑक्सिजन साठा उपलब्ध ठेवला जात आहे. त्यासाठी ऑक्सिजन निर्मिती करणारे 23 प्रकल्प उभारले आहेत. त्यातून 23 मेट्रीक टन ऑक्सिजनची रोज निर्मिती होणार आहे. द्रवरूप ऑक्सिजनसाठी 246 मेट्रीक टन क्षमतेच्या 19 टाक्या आहेत. 130 मेट्रीक टन साठ्याचे 7271 ऑक्सिजन सिलिंडरही तयार ठेवण्यात आले आहेत. महापालिका रुग्णालयांमध्ये 8 हजार खाटा सज्ज आहेत. 2200 खाटांना ऑक्सिजनची सुविधा आहे.