आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना परवानगी देण्याच्या मुद्यावरुन आणि बंडातात्या कराडकर यांच्यावर झालेल्या कारवाईचा विरोध करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेकडून कराडच्या तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वारीला बंदी हे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचे पाप सरकारने केल्याची टीका संभाजी भिडे यांनी कराड येथे केली.
बंडातात्या कराडकर यांनी वारीसंदर्भात भूमिका घेतल्यानंतर स्थानबध्द कारवाईच्या निषेर्धात शिवप्रतिष्ठान संघटनेने कराड येथे निषेध मोर्चा काढून संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत कराड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. वारीचा मुक्काम जिथं जिथं होतो, त्या त्या गावात परिसरातील लोकांनी येऊन एकत्र मुक्काम करावा, असं आवाहन संभाजी भिडे यांनी केलं. पोलीस अडवतील पण विरोध मोडून काढा, असे आवाहन शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी केले.
जय जय राम कृष्ण हरीच्या गजरात बंडातात्या कराडकर यांच्या वरील कारवाईच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठान संघटनेकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी जय जय राम कृष्ण हरीच्या गजरात धारकरी मोर्चात सहभागी झाले होते.
हभप बंडातात्या कराडकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. तसेच ते समाज प्रबोधनकारही आहेत. त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला होता. यापूर्वी गोहत्या बंदी कायद्यासाठी त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांना अडवलं होतं. गो हत्या बंदी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा रोखण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
हभप बंडातात्यांनी 1996मध्ये व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना केली होती. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी ही संस्था काम करते. गेल्या 20 वर्षांपासून बंडातात्यांचं हे कार्य सुरू आहे. त्याशिवाय युवकांना इतिहास माहीत व्हावा म्हणून ते गडकोटांवर प्रतापी संस्कार सोहळ्याचे आयोजन करतात. 1997पासून ही सुरुवात झाली, ती आजतागायत सुरू आहे.
व्यसनमुक्ती करतानाच त्यांनी गुरुवर्य भगवान मामा कराडकर शिक्षण संस्थेची स्थापना केली. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये ही संस्था कार्यरत आहे. या शिक्षण संस्थेतून गुरुकूल पद्धतीने शिक्षण दिलं जातं. विशेष म्हणजे राज्यातील पहिली वारकरी शिक्षण देणारी ही शाळा आहे.