काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी पाहणं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून कायम करण्यासारखं आहे, असा टोला प्रसिद्ध गीतकार आणि संवाद लेखक जावेद अख्तर यांनी लगावला आहे. जावेद अख्तर यांनी काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांना हा टोला लगावला आहे.
काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधींना भावी पंतप्रधान संबोधणारं ट्विट केलं होतं. या ट्विटला प्रत्युत्तर देताना जावेद अख्तर यांनी हा टोला लगावला आहे. जावेद अख्तर या ट्विटमध्ये म्हणतात, मिस्टर सलमान खुर्शीद, लोकशाहीचा राजा हा तुमचा विरोधाभास अत्यंत निराशजनक आहे. एक श्रेष्ठ विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी स्वीकारण्या योग्य आहेत. परंतु, त्यांना पंतप्रधान बनविण्याचे जे कोणी स्वप्न पाहत आहेत, ते लोक मोदींना पंतप्रधान म्हणून कायम ठेवण्याचा प्रयत्नच करत आहेत.
21 मे रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा यांची पुण्यतिथी होती. त्यानिमित्त खुर्शीद यांनी ट्विटरवर राहुल गांधी आणि राजीव गांधी यांचा फोटो शेअर केला होता. ‘एकेकाळचे आणि भविष्यातील लोकशाहीचे राजे’, अशी कॅप्शन त्यांनी या फोटोला दिली होती. त्यावर अख्तर यांनी टीका केली आहे.
दरम्यान, अख्तर यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी नाराजी दर्शवली आहे. तर काहींनी अख्तर यांचं समर्थनही केलं आहे. ‘चुकीचं. राहुल गांधींकडे पंतप्रधान बनण्याचा वकुब आहे. तुम्ही डोळे बंद करून त्यांच्याविरोधात मोहीम चालवत आहात. भाजपने आयटी सेलच्या माध्यमातून त्यांची इमेज खराब केली असून त्याला तुम्ही बळी पडले आहात. मोदी देशाला एक किंवा दोनदा फसवू शकतात. वारंवार फसवू शकत नाहीत’, असं निखिल जाधव या नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, ‘ठिक आहे. राहुल गांधींबाबत तुमचं मत तयार झालं आहे. मग तुम्ही पंतप्रधान म्हणून कुणाला पाहत आहात. तेही सांगा. म्हणजे तुमचे ट्विट अधिक स्पष्ट होईल’, असं रत्ना बाजपेई यांनी म्हटलं आहे.