आज दि.२५ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

मोदींनी आव्हान दिल्यामुळे
चीनने व्हायरल वॉर सुरू केलं

देशात करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी फेब्रुवारी ते मे पर्यंत अक्षरशः थैमान घातलेलं बघायला मिळालं. भाजपाच्या राष्ट्रीय महासचिवांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेमागे चीन असल्याचा दावा केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं चीनला आव्हान देत आहेत, आणि याचं प्रत्युत्तर म्हणून चीनने व्हायरल वॉर सुरू केलं आहे,” असं विधान भाजपाच्या राष्ट्रीय महासचिवांनी केलं आहे. राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय म्हणाले,”करोनाची दुसरी लाट पसरली की, पसरवली गेली… हा चौकशीचा विषय आहे. जगामध्ये कुणी चीनला आव्हान दिलं असेल, तर ते भारताने आणि मोदींनी दिलं आहे. हा चीनने केलेला व्हायरल हल्ला आहे का ? अशी चर्चा आता सुरू झाली आहे,” असं विजयवर्गीय म्हणाले.

रेड झोन जिल्ह्यातील
होमआयसोलेशन सुविधा बंद

राज्यातल्या करोना आकडेवारीच्या सरासरीपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण संपूर्णपणे बंद कऱण्याचे आदेश दिल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. म्युकरमायकोसिस आणि करोना या दोन आजारांसंदर्भातल्या आज झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले, “रेड झोनमध्ये असणाऱ्या जिल्हांमधल्या सर्व बाधितांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी अशा जिल्ह्यांतल्या कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

सुशील कुमारला केले
रेल्वे सेवेतून निलंबीत

दिल्लीच्या प्रसिद्ध छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटू सागर राणा याच्या हत्येच्या पोस्टमार्टम अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार सागरच्या शरीरावर अनेक ठिकाणी निळ्या रंगाचे निशान होते आणि त्यावर धारदार जड वस्तूने मारा करण्यात आला होता. यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेत पदकविजेता सुशील कुमार याच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुशील कुमार याला रेल्वे सेवेतून देखील निलंबीत करण्यात आले आहे.

सिपला कंपनीचं आरटी-पीसीआर
टेस्ट किट आजपासून विक्रीला

सिपला औषध कंपनीने करोनाची चाचणी करण्यासाठी ‘ViraGen’ हे आरटी-पीसीआर किट बाजारात विक्रीसाठी आणलं आहे. आजपासून हे किट उपलब्ध असणार आहे. या किटला आयसीएमआरकडून मान्यता मिळाली आहे. सिपलाने गेल्या आठवड्यात या किटबाबत माहिती दिली होती. करोनाची चाचणी करण्यासाठी सिपला कंपनीचं हे तिसरं प्रोडक्ट आहे. यापूर्वी अँटिजेन टेस्टिंग किट आणि अँटीबॉडी टेस्टिंग किट बाजारात आणलं आहे. ‘ViraGen’ या किटमुळे करोनाबाबतचं माहिती मिळणार आहे.

घोटाळेबाज मेहुल चोक्सी
अँटिग्वामधूनही फरार

पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावल्यानंतर भारतातून फरार झालेला मेहुल चोक्सी अँटिग्वामधूनही फरार झाला आहे. नीरव मोदीचा मामा आणि गीतांजली जेम्सचा प्रमोटर मेहुल चोक्सी अँटिग्वामधून फरार होऊन क्युबामध्ये गेला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अँटिग्वा पोलिसांनी याप्रकरणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. भारतातून फरार झाल्यानंतर मेहुल चोक्सीने अँटिग्वा आणि बारबुडा या देशांचं नागरिकत्व घेतलं होतं.

डॉक्टरांच्या बद्दल बाबा रामदेव यांचे
आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

योगगुरू रामदेव बाबा यांचा आणखीन एक व्हिडीओ समोर आलाय. व्हिडीओमध्ये रामदेव योगा करता करता योगसाधना करणाऱ्यांशी गप्पा मारताना दिसत आहेत. मात्र बोलता बोलता त्यांनी करोनाशी लढत असताना मरण पावलेल्या डॉक्टरांबद्दल वक्तव्य केलं असून आता हा व्हिडीओ व्हायरल होतोय. एक हजार डॉक्टर करोनाच्या दोन्ही लसी घेतल्यानंतरही मेले आहेत, असं बाबा रामदेव या व्हिडीओत सांगताना दिसतात. जे लोक स्वत:ला वाचवू शकत नाहीत ते कसले डॉक्टर?, असा प्रश्नही बाबा रामदेव यांनी उपस्थित केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे

बंगालमधील हिंसाचार प्रकरणी
सुप्रीम कोर्टाचे केंद्रावर ताशेरे

बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यामुळे नागरिक राज्य सोडून जात असल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली. यासाठी सुप्रीम कोर्टात नागरिकांचं पलायन रोखण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत तपासासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्यासोबत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारकडे उत्तर मागितलं आहे.

‘यास’ चक्रीवादळ भारताच्या
पूर्व किनारपट्टीवर धडकणार

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर तौते धडकलं, तर आता २४ तासांहून कमी कालावधीमध्ये ‘यास’ चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार आहे. प्रामुख्याने ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारपट्टी भागामध्ये या चक्रीवादळाचा तडाखा बसणार असून उत्तर ओडिशा किनारपट्टीजवळ असणाऱ्या धामरा बंदरावर चक्रीवादळ आपला लँडफॉल करणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं. बंगालच्या उपसागरात यास चक्रीवादळ उद्या बुधवारी २६ मे रोजी सकाळीच ते उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीजवळ पोहोचणार आहे.

शशी थरूर यांचे लोकसभा
सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

टूलकिट प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपामध्ये वाकयुद्ध सुरु आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. काँग्रेस खासदार आणि आयटी समितीचे सदस्य असलेल्या शशी थरूर यांच्यावर भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. त्यांना आयटी समिती सदस्य पदावरून हटवण्यासह त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निशिकांत दुबे यानी केली आहे. त्यांनी लोकसभा सभापती ओम बिरला यांना पत्र लिहीलं असून संविधानातील दहाव्या अनुसूचीतील नियमांचा संदर्भ दिला आहे.

हे महाराष्ट्राच्या राजकीय
संस्कृतीमध्ये बसत नाही : सामंत

शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाल्याचा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी केला. या प्रकरणावर उदय सामंत यांनी मौन सोडलं. सामंत म्हणाले, “माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाली, हे कुणी सांगितलंय… ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ज्या मंडळींना कोकणाने दोन-दोन वेळा नाकारलं. कोकणातील जनतेनं नाकारलं आहे. त्यांनी माझं राजकीय अस्तित्व अस्थिर करण्यासाठी गुप्त बैठक झाली. राजकीय खलबतं झाली, अशा प्रकारचं ट्विट करणं, हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये बसत नाही. असा खोचक सवाल सामंत यांनी केला.

करोनाग्रस्त मिल्खा सिंग
रूग्णालयात दाखल

भारताचे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांनाही चंदीगडमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:ला घरातच विलगीकरणात ठेवले होते. परंतु सोमवारी (२४ मे) त्यांना रुग्णालयात हालवण्यात आले आहे. मिल्खा सिंग यांचा मुलगा आणि प्रसिद्ध गोल्फर जीव मिल्खा सिंग यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जीव यांनी सांगितले आहे. जीव म्हणाले की, “मिल्खा सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.