भंगारवाला म्हंटलं की डोळ्यांसमोर येतं पाठीवर पोतं घेतलेला एका निस्तेज चेहऱ्यांचा माणूस. भंगारवाल्याची दिवसाची कमाई जास्तीत जास्त किती असू शकते? हजार, दोन हजार, पाच हजार? पण असाही एक भंगारवाला आहे ज्यानं सरकारला चुना लावत कोट्यवधींची माया जमवली आहे.
दारोदार फिरणारा भंगारवाला कोट्यधीश असू शकतो. होय हे अगदी खरंय. कारण अशाच एका करोडपती भंगारवाल्याच्या अटकेनंतर मोठं बिंग फुटलंय. हा भंगारवाला औरंगाबादचा असून त्यानं दिल्ली सरकारला तब्बल 200 कोटींचा गंडा घातलाय. जीएसटी इनपूट क्रेडिटच्या माध्यमातून त्यानं ही फसवणूक केली आहे. हा भंगार विक्रेता भंगाराची विक्री न करता बनावट बिलं तयार करायचा.
करोडपती भंगारवाल्याचं नाव समीर मलिक आहे. बनावट बिलं तयार करून जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिटच्या माध्यमातून त्यानं 200 कोटींचा चुना लावला.
औरंगाबादमधील 15 भंगार व्यावसायिकांकडे त्यानं बनावट बिलाच्या आधारे व्यवहार केला. बोगस कंपनीच्या नावावरून त्यानं कोट्यवधींची बनावट बिलं तयार केली. त्यातून जवळपास दहा कोटींची बिलं औरंगाबादच्या एकाच व्यापाऱ्याला पाठवली. मात्र अशी बिलं तब्बल शहरातल्या 15 व्यावसायिकांना पाठवण्यात उघड झालं आहे.
आता या प्रकरणात औरंगाबादमधील 15 भंगार विक्रेते जीएसटी विभागाच्या रडारवर आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती परराज्यातही असल्याचं सांगण्यात येतंय.
करोडपती भंगारवाल्याच्या या कारनाम्यानं औरंगाबादच नव्हे तर देशभरातील भंगार व्यावसायिक चौकशीच्या रडारवर आले आहेत. एकाच भंगारवाल्यानं सरकारला शेकडोंचा चुना लावल्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती हजारो कोटींच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.