इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) दोन्ही फायनलिस्ट संघ आपल्याला मिळाले आहेत. धोनीच्या चेन्नईने पहिल्या क्वॉलीफायर सामन्यात दिल्लीला नमवत अंतिम सामन्यात एन्ट्री मिळवली होती. आता केकेआरने देखील दिल्लीला नमवत फायनलचं तिकीट मिळवलं आहे. पण केकेआर आणि दिल्लीमधील हा सामना म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील काही चुरशीच्या सामन्यांपैक एक ठरला.
दिल्लीच्या 136 या सोप्या लक्षाचा पाठलाग केकेआरने उत्तम सुरु केला. एका क्षणी केकआरला 24 चेंडूत केवळ 13 धावांची गरज होती. सोबत त्यांच्या हातात 8 विकेट्सही होते. पण त्याच क्षणी दिल्लीच्या गोलंदाजानी जादूई गोलंदाजी करत केकेआरचे एक-एक फलंदाज तंबूत धाडले. एकाक्षणी 2 चेंडूत 6 धावांची गरज केकेआरला असतानाच राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. विजयानंतर संपूर्ण केकेआर संघाने जल्लोष केला.
सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने गोलंदाजी निवडली. त्यामुळे दिल्लीच्या खेळाडूंनी प्रथम फलंदाजी केली. पण संघातील सर्वच खेळाडू केकेआरच्या गोलंदाजीच्या माऱ्यासमोर गारद झाले. ज्यामुळे ते केवळ 135 धावाच करु शकले आहेत. यामध्येही शिखरने सर्वाधिक 38 तर अय्यरने नाबाद 30 धावा केल्या. य़ाशिवाय शॉ आणि स्टॉयनीसने प्रत्येकी 18 तरल हीटमायरने 17 धावा केल्या. केकेआरकडून मिस्ट्री स्पीनर चक्रवर्तीने 2 तर मावी आणि फर्ग्यूसनने प्रत्येकी 1 विकेट घेतला.
अवघ्या 136 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या केकेआरच्या सलामीवीरांनी अप्रतिम फलंदाजी करत संघाचा विजय जणू पक्का केला होता. व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिल यांनी मिळून मोठी भागिदारी केली. 96 धावांवर संघ असताना अय्यर 55 धावा करुन बाद झाला. त्याने 41 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तर शुभमन 46 धावा करुन बाद झाला. त्याने 46 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्यासोबत नितीशने 13 धावा केल्या. पण या दोघांच्या बाद होताच संघाला जणू उतरती कळाच लागली. एक एक करत फलंदाज बाद होत गेले. अगदी शेवटच्या षटकात लागोपाठ दोन विकेट जाताच 2 चेंडूत 6 धावांची गरज संघाला होती. त्याचवेळी राहुल त्रिपाठीने दमदार असा षटकार ठोकत संघाला 3 विकेट्स आणि 1 चेंडू राखून विजय मिळवून दिला.