आज दि.१९ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

तुमची शेपूट आम्ही ओढून
काढू : संजय राऊत

संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना आव्हान दिलं आहे. “भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे नवे महात्मा जन्माला आले आहेत. आम्ही त्यांना आव्हान करतो. तुम्ही जो केंद्रीय मंत्र्यांचा हजारो कोटींचा भ्रष्टाचार काढलाय, ती लढाई पुढे घेऊन जा. आमच्याकडे देखील काही कागदपत्रे आहेत. ती आम्ही तुम्हाला देतो. तुमच्यात हिंमत असेल आणि तुम्ही सच्चे असाल, तर तुम्ही ही लढाई पुढे न्याल. नाहीतर जसे या विषयावर तुम्ही शेपूट घालून बसला आहात, ती तुमची शेपूट आम्ही ओढून काढू”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास
खासदार कोल्हे यांनी केला दुग्धाभिषेक

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती, त्याच बंगळुरूमध्ये आज शिवजयंतीचे औचित्य साधत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करत शिवनामाचा गजर केला,” अशी माहिती राष्ट्रवादीकडून ट्वीट करून देण्यात आली आहे.

अमेरिकेने दिला रशियाला
कडक शब्दात इशारा

रशिया आणि युक्रेनमधील वाद शांत होण्याचे नाव घेत नाही. आता या वादात अमेरिकेने उडी घेतली आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेभोवती सैन्य तैनात केले आहे. यानंतर अमेरिकेने रशियाला कडक शब्दात इशारा दिला आहे. रशियाकडून हल्ला केला तर आम्ही युक्रेनला पाठिंबा देऊ, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हटले आहे. दरम्यान, युक्रेनला पाठिंबा देणारे अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देश रशियाशी चर्चेतून तोडगा काढण्याची चर्चा करत आहेत. मात्र, रशिया आणि युक्रेनमधील वाद अजूनही सुरूच आहे.

पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर
वाहनांच्या लांबच लांब रांगा

पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवरील उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विकेंड आणि शिवजयंती असल्याने उर्से टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. मुंबई आणि पुण्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडलेले पाहायला मिळत आहे.

राज ठाकरे यांच्या कार्यक्रमात
चक्क स्टेज कोसळले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज गोरेगावत एक कार्यक्रम होता. यावेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. कारण मनसेच्या या कार्यक्रमात चक्क स्टेज कोसळल्याचे दिसून आलं. राज ठाकरे याच स्टेजवर उभे होते. त्याच्या थोडा मागे स्टेज खचला. सुरूवातील यात काही महिलाही अडकल्याचे दिसून आले. मात्र राज ठाकरे सुरक्षित आहे. त्यांना या गोंधळात काहीही झालं नाही. राज ठाकरे यांना पाहण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत असते. राज ठाकरेंच्या सभेला मैदानेही तुडुंब भरतात. हाच प्रकार आज गोरेगावात झाला.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची
१४० वी बैठक मुंबईत होणार

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची १४० वी बैठक मुंबईत होणार आहे. शनिवारी बीजिंगमध्ये झालेल्या १३९ व्या ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत भारताने पुढील बैठकीचे यजमानपद मिळवले. या काळात कोणत्याही देशाने भारताला विरोध केला नाही. आता २०२३ मध्ये, भारत दुसऱ्यांदा ऑलिम्पिक समितीच्या बैठकीचे यजमानपद भूषवणार आहे, तर ही बैठक प्रथमच मुंबईत होणार आहे.

कसोटी संघ कर्णधारपदी
रोहित शर्माची निवड

विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर कसोटी संघाचं कर्णधारपद रिक्त होतं. त्यामुळे टीम इंडियाचा पुढील टेस्ट कॅप्टन कोण होणार, याबाबतची जोरदार चर्चा ही क्रिकेट वर्तुळात सुरु होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. टीम इंडियाला कायमस्वरुपी कसोटी कर्णधार मिळाला आहे. आयसीसीने ट्विट करत कसोटी कर्णधाराचं नाव जाहीर केलं आहे. बीसीसीआयने (BCCI) रोहित शर्माची टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदी निवड केली आहे.

न्यायालय जो आदेश देईल त्यावर
मला विश्वास : विकास पाठक

विकास पाठक म्हणाला, “मला न्यायालयावर विश्वास आहे. न्यायालय जो आदेश देईल त्यावर मला विश्वास आहे. मी एका व्यक्तीला खूप मानायचो, मानतो आहे आणि मानत राहिल. ते आहेत स्वर्गीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. ते देखील लाखो लोकांचा आवाज होता. ते लोकांच्या हक्कासाठी खूप लढले. बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यातही खूप साऱ्या अडचणी आल्या. ते त्याला सामोरे गेले, पण त्यांनी कधीही लोकांचा विश्वास तोडला नाही. ते शेवटच्या श्वासापर्यंत लोकांच्या हक्कासाठी लढले.”

देशात सर्वात उंच शिवरायांचा
पुतळा औरंगाबादेतच उभा राहिला

शहरात रात्री मोठ्या धुमधडाक्यात क्रांती चौकातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. देशातला सर्वात उंच असा हा शिवरायांचा अश्वारुढ पुतळा असून या शिल्पामुळे औरंगाबादच्या वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाइन उपस्थितीत तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत या पुतळ्याचे लोकर्पण करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून हजारो शिवप्रेमी महाराजांच्या या प्रेरणादायी पुतळ्याचं दर्शन घेण्यासाठी उत्सुक होते.

टीईटी घोटाळ्याप्रकरणी
पुण्यात तिघांना अटक

महराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पुणे सायबर पोलिसांना आरोग्य भरती परीक्षेचा तपास करताना टीईटी परीक्षेतील घोटाळ्याची लिंक लागली होती. त्यानंतर टीईटी परीक्षेत घोटाळा करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांना, एजंट आणि परीक्षेची जबाबदारी असणाऱ्या जीएस. सॉफ्टवेअरच्या बड्या लोकांना अटक करण्यात आलीय.

हिजाब परिधान करणे इस्लाम
धर्माची प्रथा नाही; कर्नाटक सरकार

शाळा, महाविद्यालयांमध्ये हिजाब परिधान करण्यावरून निर्माण झालेल्या वादावर अजून पडदा पडलेला नाही. कर्नाटक उच्च न्यायालयात ही आज या प्रकरणाची सलग सहाव्या दिवशी सुनावणी झाली. यावेळी कर्नाटकमधील भाजपच्या बोम्मई सरकारने बाजू मांडली. सरकारने हिजाब परिधान करण्यास केलेल्या मनाईचे समर्थन करीत आजच्या सुनावणी वेळी जोरदार युक्तीवाद केला. हिजाब परिधान करणे ही इस्लाम धर्माची प्रथा नाही. संविधानाच्या कलम 19(1) अन्वये मिळणार्‍या मूलभूत अधिकारांचाही हा भाग नाही, असे म्हणणे सरकारने मांडले आहे.

रेल्वेतही स्वदेशी बनावटीवर
भर : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मोदींनी विविध रेल्वे प्रकल्पावर भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या भाषणात यावेळी मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेचा उल्लेख आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी केल्या या उल्लेखामुळे हा हायस्पीड रेल्वेचा मुद्दा पुन्हा तपाण्याची शक्यता आहे. या बुलेट ट्रेनला आधीपासून अनेक राजकीय पक्षांनी आणि शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

SD social media
98 5060 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.