राज्यातील दिव्यांगांना आता आपल्या नावाची नोंदणी सरकार दरबारी करताच त्यांना अनेक सुविधा या मोफत मिळणार आहेत. महाराष्ट्र शासनाने महाशरद पोर्टल प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या https//mahasharad.in या संकेतस्थळावर नोंदणी केल्यास दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध होणार आहे. त्यासाठी दिव्यांगांनी महाशरद पोर्टल प्रणालीचा लाभ घ्यावा, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे.
महाशरद https//mahasharad.in या संकेतस्थळावर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती त्याचप्रमाणे देणगीदार, अशासकीय सामाजिक संघटना व समाजसेवक हे निःशुल्क नोंदणी करू शकतात. आवश्यक साहित्य मिळणेबाबत नोदंणी केल्यानंतर दिव्यांग व्यक्तींना अनेक साहित्यांची सुविधा मोफत उपलब्ध होणार आहे.
हे पोर्टल दिव्यांग व्यक्तींना मदत मिळण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांना जोडणारा महत्वाचा दुवा असून, एकाच छताखाली या सुविधा उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांनी त्यांना आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध होण्यासाठी व समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी आर्थिक मदत करण्यासाठी महाशरद पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहनही जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे.
महाशरद पोर्टलरुपी हे अभियान म्हणजे राज्यातील दिव्यांगांसाठी सहाय्य उपलब्ध होण्याची नामी संधी असनू, ज्यामध्ये ते थेट शासनाच्या मंचाद्वारे मागणी करू शकतात. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमातील विशेषत्वाने नमदू केलेल्या दिव्यांग व्यक्ती शासनाच्या मंचावर विस्तृतपणे नोंदणी करून त्यांना आवश्यक ती मदत तथा सहकार्य मिळवू शकतात.
1) संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग आणि त्यांना देणगी देऊ इच्छिणाऱ्या देणगीदारांना एकाच पोर्टलखाली नोंदणी करणे आणि त्यांचे समर्थन करणे.
2) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळांच्या योजनांची माहिती देणे.
3) विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगाची परीस्थिती आणि गरजा समजून घेणे.
4) दिव्यांग, अशासकीय संघटना, समाजसेवक आणि देणगीदार या सर्वांना एकाच छताखाली आणणे.