नाशिकच्या सप्तशृंगी गडावर ढगफुटी सदृश्य पाऊस
सध्या राज्यभरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नाशिकमध्येही तुफान पाऊस सुरू आहे. नाशिकच्या सप्तशृंगी गड येथे ढगाफुटी सदृष्य पाऊस सुरू असल्याचा एका व्हिडीओदेखील समोर आला आहे.मंदिराच्या वरच्या बाजूने डोंगरावरून येणाऱ्या पाण्यामुळे पायऱ्यांवरुन धबधबा वाहत असल्या सारखा दिसत आहे. सप्तशृंगी मंदिर येथून खाली पायऱ्यांवरून पाण्यासोबतच चिखल-दगड वाहून येत असल्याने काही भाविकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. या सर्वात सात भाविक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
आषाढी वारी करुन परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला जबर अपघात; 10 जणं जखमी
आषाढी वारी करून परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाल्याचं समोर आलं आहे. टेम्पो उलटून घडलेल्या अपघातामध्ये दहा वारकरी जखमी झाले आहेत. तासगाव तालुक्यातील मनेराजुरी या ठिकाणी हा अपघात घडला. जखमींना तातडीने सांगली आणि मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील भागाईवाडी व परिसरातील 60 वारकरी हे आषाढीवारी निमित्ताने पंढरपूरला गेले होते. आषाढी वारी संपल्यानंतर पुन्हा गावी परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाला. एका टेम्पोमधून हे सर्व वारकरी पंढरपूर येथून सकाळी निघाले. दरम्यान दुपारी तासगाव तालुक्यातील मनेराजुरी येथील पावर वस्तीजवळ पोहचले असता वळण घेताना टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्यानंतर टेम्पो हा रस्त्याकडेला पलटी झाला.
सत्तास्थापनेनंतर फडणवीस-शिंदेंचा पहिलाच एकत्र दौरा; गडचिरोलीत करणार पूर परिस्थितीची पाहणी
राज्यात भाजप आणि शिंदे गट यांनी सरकार स्थापन केलं आहे. यानंतर आता पहिल्यांदाच दोघंही एकत्र दौऱ्यावर निघाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गडचिरोली दौऱ्यावर जाणार आहेत. याठिकाणी ते पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत आणि आढावा घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस मंत्रालयातून रवाना झाले आहेत. या दौऱ्यासाठी दुपारची MMRDA ची बैठक रद्द करण्यात आली आहे.
नवीन संसद भवनाच्या छतावरील भव्य अशोक स्तंभाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण
नवीन संसद भवन वास्तूचे बांधकाम वेगाने सुरू आहे. सध्याची संसद भवनाची इमारत जितकी आकर्षक आणि भव्य आणि त्याहूनही भव्य आणि आकर्षक नवीन इमारत असावी, असा सरकारचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नवीन संसद भवनाच्या छतावरील 20 फूट उंच भव्य अशोक स्तंभाचे अनावरणही केले. यावेळी त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते.नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या अशोक स्तंभाच्या भव्यतेचा अंदाज त्याची उंची आणि वजनावरुन लावता येईल. अशोकस्तंभाचे वजन 9500 किलो आहे जी पूर्णत: तांब्याने तयार करण्यात आलं आहे. याच्या सपोर्टसाठी सुमारे 6500 किलो वजनाची स्टीलचा ढाचा देखील तयार करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून विजय माल्ल्याला 4 महिन्यांचा तुरुंगवास आणि 2 हजारांचा दंड
भारतातील बँकांचं कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यांचा तुरुंगवास आणि 2 हजारांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती यू. यू. ललित यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींचे खंडपीठ हा निकाल सुनावला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 10 मार्च रोजी निकाल राखून ठेवला होता. 9 मे 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने उद्योगपती विजय माल्ल्याला न्यायालयाच्या अवमानप्रकरणी दोषी ठरवले होते. माल्ल्याने त्याच्या मालमत्तेची चुकीची माहिती दिली होती.
गेल्या चार वर्षात जम्मू काश्मीरमधील ७०० तरुणांची दहशतवादी संघटनांमध्ये भर्ती
गेल्या चार वर्षांत जम्मू आणि काश्मीरमधील जवळपास ७०० तरुणांची दहशतवादी संघटनांनी भरती करण्यात आली असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सध्या केंद्रशासित प्रदेशात १४१ सक्रिय दहशतवादी आहेत, त्यापैकी बहुतेक दहशतवादी परदेशी असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये सीमेपलीकडून दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रकुल खेळांपूर्वी मिताली राजचे भारतीय संघाबद्दल मोठे वक्तव्य
येत्या २८ जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळच्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय महिला संघदेखील या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने एक वक्तव्य केले आहे.
मिताली राजने गेल्या महिन्यात क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतल आहे. सध्या ती तिच्या आयुष्यावरील ‘शाबाश मितू’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्यानिमित्त कलकत्यात असताना तिने भारतीय महिला संघ आणि आगामी राष्ट्रकुल स्पर्धांबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. मिताली म्हणाली, “मला वाटते की कोणत्याही मोठ्या स्पर्धेपूर्वी तयारी करणे खूप महत्वाचे आहे. चांगली तयारी आणि योग्य रणनीती घेऊन मैदानात उतरल्यास पदक जिंकण्याची चांगली संधी असते. आपल्या मुली तयारी करूनच मैदानात उतरतील.”
SD Social Media
9850 60 3590