गोव्यातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षांनी स्वतः पदभार स्वीकारला आहे. गोव्यातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी खासदार मुकुल वासनिक यांना गोव्यात पाठवलं आहे. काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. केसी वेणुगोपाल यांनी ट्विट केलं, “काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी खासदार मुकुल वासनिक यांना राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी गोव्याला भेट देण्यास सांगितलं आहे.”
मायकल लोबो यांच्यावर काँग्रेसने मोठी कारवाई करत त्यांना गोवा विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून हटवलं आहे. गोवा डेस्क प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, काँग्रेसचे गोवा युनिटचे नेते मायकल लोबो आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे भाजपशी संगनमताने पक्षाविरुद्ध कट रचत आहेत, काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करेल.
काँग्रेसचे गोवा डेस्क प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सांगितलं की, लोबो आणि कामत यांच्याशिवाय पक्षाच्या इतर तीन आमदारांशी संपर्क होऊ शकलेला नाही. 40 सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसचे काही आमदार भारतीय जनता पक्षात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात असताना या घडामोडी समोर आल्या आहेत. राव म्हणाले, “एललोपी मायकल लोबो आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे गोव्यात काँग्रेसमध्ये पक्षांतर व्हावं यासाठी भाजपसोबत कट रचत होते यामुळे लोबो यांना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.’
लोबो आणि कामत या दोघांवरही पक्ष कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गोव्यात काँग्रेसचे सध्या ११ आमदार आहेत. राव म्हणाले की, लोबो, कामत, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि डेलियाला लोबो या पक्षाच्या पाच आमदारांशी संपर्क होऊ शकला नाही, तर इतर पाच – एल्टन डी’कोस्टा, संकल्प आमोणकर, युरी आलेमाओ, कार्लोस अल्वारेस फरेरा, रुडॉल्फ फर्नांडिस पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
राव म्हणाले की, सहावे आमदार अलेक्सो सिक्वेरा हे पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि काँग्रेससोबत आहेत. सत्ताधारी भाजपकडे सध्या 20 आमदार असून त्यांना इतर पाच आमदारांचा पाठिंबा आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 11 जागा जिंकल्या होत्या.
दुसरीकडे, काँग्रेस आमदाराच्या भेटीबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, ‘मुख्यमंत्री म्हणून मला अनेक लोक भेटायला येतात. उद्या विधानसभा आहे, लोक मला भेटायला आले होते. मी माझ्या विधानसभेच्या कामात व्यस्त आहे. मी इतर पक्षांच्या मुद्द्यांवर भाष्य का करू? काँग्रेस आमदार आणि मायकल लोबो यांच्या पत्नी डेलिलाह लोबो मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना दिसल्या होत्या.