शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील न्यायलयीन लढाईकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बजावलेल्या नोटिशींविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 27 जूनला झालेल्या सुनावणीच्या वेळी 11 जुलै ही पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली होती. या सुनावणीनंतर शिवसेना आणि शिंदे गटाने वेगवेगळय़ा याचिका दाखल केल्या आहेत. मात्र, आता यावरील आजची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयातील सोमवारच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश नाही.
सर्वोच्च न्यायालयाची सुट्टी संपून नियमित कामकाज सोमवारपासून सुरू होत आहे. सरन्यायाधीश एऩ व्ही़ रमण यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाची कार्यसूची रविवारी जाहीर करण्यात आली होती. त्यात या याचिकांचा सुनावणीसाठी समावेश नाही. या याचिका इतर कोणत्याही खंडपीठाकडे वर्गही करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यासंदर्भात आज होणारी सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटाने राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टातील तरतुदीनुसार अन्य पक्षात प्रवेश न केल्याने त्यांना अपात्र ठरवावे आणि त्यांच्या पाठिंब्यावर सत्तेवर आलेले सरकार घटनाबाह्य ठरवावे. या प्रमुख मागणीसह अनेक गोष्टींना आव्हान देणारी याचिका शिवसेनेने केली आहे. तर, अपात्रतेच्या नोटिशींना आणि अजय चौधरींच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणारी याचिका शिंदे गटाने दाखल केली आहे.
शिवसेनेच्या वकिलांनी सुनावणीची तारीख देण्याची विनंती केली तर सरन्यायाधीश रमण हे आपल्या पीठापुढे सुनावणी कधी घ्यायची किंवा अन्य पीठाकडे याचिका वर्ग करायच्या, याचाही निर्णय घेतील. यााबाबतही सूत्रांनी माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिंदे सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे आता ही सुनावणी नेमकी कधी होणार याकडेच राज्याचं लक्ष लागलेलं आहे.