उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. हे धाडसत्र सुरू असतानाच भाजप नेते निलेश राणे यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांनी रडणं बंद करावं. अजितदादांचे बाहेर राहण्याचे जास्त दिवस शिल्लक नाहीत, असा दावा निलेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
निलेश राणे यांनी हा दावा केला आहे. आहे त्या पदावर राहून माझ्यावर अन्याय होतो असं अजित पवार सांगतात. तुमच्यावर अन्याय कसला झाला? किती वर्ष मंत्रीपदावर आहात? तुमच्या मंत्रीपदाचा महाराष्ट्राला किती फायदा झाला? म्हणून अजित पवार यांनी रडणं बंद करावं. जास्त दिवस शिल्लक नाहीयेत आता. अजित पवारांचे बाहेर राहण्याचे जास्त दिवस शिल्लक नाहीयेत आता, असं राणे म्हणाले.
अजित पवारांवर धाडी पडतात याचा अर्थ त्यांनी काही तरी गडबड केली असणार. गडबडीसाठीच त्यांचं नाव प्रसिद्ध आहे. विधायक कामांसाठी त्यांचं नाव आहे असं एखादं उदाहरण मिळणार नाही. म्हणून त्यांच्या घरावर त्यांच्या कंपन्यांवर रेड पडतेय याचा अर्थ गडबड केली असणार त्यांनी. म्हणून रेड पडत आहे. आता अजित पवार जे काही रडत आहेत. त्यांनी किती कुटुंब उद्ध्वस्त केली. किती लोकांना धंद्याला लावलं हे विसरले. ही नियती आहे. इथेच भोगावं लागतं. अजित पवार साहेब इथंच भोगणार तुम्ही. हे आता लांबपर्यंत जाणार. अजित पवार आता यातून सुटू शकणार नाही. हे त्यांनाही कळून चुकलं आहे, असं सांगतानाच माझ्यावर असं झालं तसं झालं. असं ते सांगत आहेत. मागेही रडले होते पत्रकार परिषदेत. राष्ट्रवादीत रडेच भरले आहेत. यांच्यावर आरोप झाल्यावर हे रडतात. तुम्ही कारवाईला सामोरे जा. राजीनामा द्या. मग बघू तुमचं काय होतं ते, असं आव्हानच त्यांनी दिलं.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनाही फैलावर घेतलं. लोकं काही आता दुधखुळी राहिली नाही. कोण ड्रग्स अॕडिक्ट आहे आणि कोण ड्रग्स विकतो हे मलिक यांनी स्वत:च्या घरात बघावं. चुकून एनसीबीवाले तिकडे गेले असते तर सर्वात मोठा व्यापारी यांच्या घरातच भेटला असता. मलिक यांनी औकातीत राहावं. आणि शाहरुख खानचा दलाल बनणं बंद करावं, अशी टीकाही त्यांनी केली.