रामनवमीनिमित्त गुजरातमधील दोन शहरांमध्ये काढलेल्या शोभायात्रांदरम्यान दोन गटांत तणाव निर्माण झाला. काही तरुणांनी जमावावर दगडफेक केल्याची आणि दुकाने व वाहनांची जाळपोळ केल्याची माहिती पोलिसांनी केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांचा मारा केला.
हिम्मतनगर आणि खंबाट या शहरांमध्ये रविवारी या घटना घडल्या. रामनवमीनिमित्त हिम्मतनगर शहरात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोभायात्रा छपरिया भागांत आली असता दोन गटांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुरांचा मारा केला. अन्य शहरांतील अतिरिक्त पोलीस फौजा मागवण्यात आल्या असून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
आणंद जिल्ह्यातील खंबाट शहरात रामनवमीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही जणांनी दुकाने आणि वाहनांवर दगडफेक करून नुकसान केले. काही वाहनांची जाळपोळही करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
देशभरात रविवारी रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. राम जन्मभूमी असलेल्या अयोध्या शहरात शरयू नदीत स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती, तर विविध शहरांत बालके आणि तरुणांनी रामायणातील पौराणिक पात्रांची वेशभूषा करून रामनवमी साजरी केली़.