आज (23 ऑक्टोबर) साऊथ सिनेमाचा ‘बाहुबली’ सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) वाढदिवस आहे. 23 ऑक्टोबर रोजी जन्मलेले प्रभास आज 42 वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म 23 ऑक्टोबर 1979 मध्ये चेन्नई येथे झाला. फार कमी लोकांना प्रभासचे पूर्ण नाव माहित आहे. त्याचे नाव प्रभास राजू उप्पालपती आहे. प्रभासची दक्षिण इंडस्ट्रीमध्ये अनेक टोपणनावे आहेत. काही त्याला ‘डार्लिंग’ म्हणून, तर काही ‘यंग रिबेल स्टार’ म्हणून संबोधतात.
प्रथम आपण हे जाणून घेऊ की, प्रभासला ‘डार्लिंग’ हे टोपण नाव कसे पडले. 2002 मध्ये प्रभासने तेलुगु चित्रपट ‘ईश्वर’द्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण केले. यानंतर, प्रभास 2005 मध्ये ‘छत्रपती’मध्ये दिसला होता. याचे दिग्दर्शन ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी केले होते. या चित्रपटाने 54 केंद्रांवरील चित्रपटगृहांमध्ये सलग 100 दिवस सुपरहिट चालण्याचा विक्रम केला होता. यानंतर 2010 मध्ये प्रभासचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘डार्लिंग’ आला, त्यानंतर त्याला हे टोपणनाव मिळाले. 2012 मध्ये, प्रभास राघव लॉरेन्स दिग्दर्शित अॅक्शन चित्रपट ‘रिबेल’मध्ये दिसला, त्यानंतर त्याला ‘यंग रिबेल स्टार’ देखील म्हटले गेले.
प्रभासच्या वैयक्तिक आयुष्यात अफेअरची चर्चाही खूप सुरू होती. त्याचे नाव ‘बाहुबली’तील सह-कलाकार अनुष्का शेट्टीशी जोडलेले गेले होते. अनुष्काने त्याच्यासोबत ‘बदला’ या चित्रपटातही काम केले आहे. अनेक वेळा या दोन कलाकारांच्या लग्नाची चर्चाही झाली आहे. मात्र, प्रभासने स्पष्ट केले आहे की, अनुष्का ही त्याची एकमेव खूप चांगली मैत्रीण आहे.
‘बाहुबली- द बिगिनिंग’ हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रभासचे आयुष्य बदलले. बाहुबलीमध्ये येण्यापूर्वी त्याने तेलुगू भाषेत अनेक चित्रपट केले होते, हिंदी सिनेमाशी संबंधित प्रेक्षकांसाठी तो फक्त एक दक्षिण भारतीय अभिनेता होता. एसएस राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘बाहुबली – द बिगिनिंग’ने प्रभासला प्रत्येक घरात ओळख मिळवून दिली. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करून विक्रम प्रस्थापित केला. याआधी कोणत्याही डब चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एवढी कमाई केली नव्हती. बाहुबली हा प्रभाससाठी आयुष्य बदलणारा चित्रपट ठरला.
रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये दाखवला गेला प्रभासचा चित्रपट!
‘बाहुबली – द बिगिनिंग’ या चित्रपटाचा सिक्वेल, जो 2017 साली आला, तो रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये दाखवला गेला. या सिक्वेलचे नाव आहे ‘बाहुबली 2- द कन्क्लुजन’. या चित्रपटाने बंपर कमाई केली. हिंदी डब केलेल्या आवृत्तीनेच 500 कोटींपेक्षा जास्त संकलन केले होते. अलीकडेच, बाहुबली – द बिगिनिंगचे स्क्रीनिंग लंडनमधील आयकॉनिक रॉयल अल्बर्ट हॉलमध्येही आयोजित करण्यात आले होते. 148 वर्षांत इंग्रजी भाषेत नसलेला चित्रपट दाखवण्याची ही पहिलीच वेळ होती.