NDA चे उमेदवार जगदीप धनखड हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी
देशाच्या नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी आज मतदान झाले.. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखड आणि विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात लढत होती. पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल धनखड यांचा विजय झाला आहे. धनखड हे 528 मतांनी जिंकले आहेत.
…याचं तरी आत्मपरीक्षण करा – मंत्रीमंडळ विस्तार लवकर होत नसल्याने शिंदे-फडणवीसांवर अजित पवारांची टीका
राज्यात सत्ता परिवर्तन होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवीन सरकार आलं आहे. मात्र नवीन सरकार होऊन जवळपास दीड महिना होत आला तरी देखील अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. यावरून विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात बोलताना टीका केली.
“महिनाभर झाला आपल्याला पालकमंत्री नाही, मंत्रिमंडळचा विस्तार नाही. प्रत्येकवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना माध्यमांकडून याबाबत विचारलं जातं, तेव्हा फक्त लवकरच….लवकरच.. एवढेच शब्द त्यांच्या तोंडून निघतात. होईल…, होईल… अरे पण कधी होईल?” असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.
चौथ्या टी20साठी रोहित फिट? बीसीसीआयच्या ट्विटमधून सूचक संकेत
भारत आणि वेस्ट इंडिज संघातला चौथा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना आज फ्लोरिडामध्ये खेळवण्यात येतोय. पाच सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडिया 2-1 अशा फरकानं आघाडीवर आहे. त्यामुळे फ्लोरिडातला आजचा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहील. पण या सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा खेळणार की नाही? याबाबत अजूनही संभ्रम आहे.
76 वर्षांच्या आजोबांची जिद्द; चालण्याची स्पर्धा जिंकून केलं सर्वांना थक्क
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व संस्थेच्या वर्धापन निमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन औरंगाबाद येथील एसबीएच रिटायर्ड एम्प्लॉइज वेल्फेअर प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये 80 सभासदांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये 76 वर्षांचे पद्माकर कुलकर्णी या आजोबांनी बाजीमारत स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळवला. यामुळे शाळेत ज्याप्रमाणे मुलाला जिंकल्यानंतर आनंद होतो. त्याचप्रमाणे आनंद या आजोबांना देखील झाला आहे. या स्पर्धेसाठी पुरुषांच्या बरोबरीने महिला वर्गाचा व 83 वर्षांच्या आजोबांचा सहभाग लक्षवेधी ठरला.
सांगली : जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंत्यास लाच घेताना जावायासह अटक
राजकीय आशीर्वादाने गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ सांगलीत तळ ठोकून असलेल्या जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंत्यास एक लाखाची लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या रंगेहात अटक केली. त्याच्यासोबत असणाऱ्या त्याच्या जावयालाही अटक करण्यात आली आहे.
सार्वजनिक स्वच्छता, उपहारगृह दुरुस्ती व मजूर पुरवठा करण्याचा ठेका ई-निविदेच्या माध्यमातून मंजूर झाला असताना संबंधित ठेकेदाराकडून कार्यारंभ आदेश देण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने लाचखोरांना पकडण्यासाठी सापळा लावला होता.
करोना वाढीबद्दल केंद्रीय आरोग्य सचिवांचा सात राज्यांना सतर्कतेचा इशारा, महाराष्ट्रालाही खबरदारीच्या सुचना
देशातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता केंद्राने सात राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी दिल्ली, केरळ, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना याबाबत पत्र लिहिले आहे. या राज्यांमध्ये आठवड्याचा करोना संसर्गाचा दर १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या राज्यांनी लसीकरण मोहिमेला वेग देण्यासोबतच कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सुचना आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.
पुण्यात देशभक्तीपर गाणी गात विद्यार्थ्यांची मेट्रो सफर
झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा… ए वतन मेरे आबाद रहे तू… हम होंगे कामयाब… अशी देशभक्तीपर गाणी पुणे मेट्रोमध्ये गात तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशाला शनिवारी अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली.
नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ॲाफ इन्स्टिटयूटमधील चार विभागांतील प्रत्येकी ७५ विद्यार्थी या प्रमाणे एकूण ३०० विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मेट्रोची सफर घडवण्यात आली. विद्यार्थ्यांनी वनाझ ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर मेट्रोतून प्रवास केला. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर, पुणे मेट्रोचे मनोजकुमार डॅनियल, दीपक पिल्ले आदी उपस्थित होते.
‘काश्मीर’ मुद्द्यावरून चीनचे भारत-पाकिस्तानला आवाहन
भारताला जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा मिळून म्हणजेच कलम ३७० हटवून तीन वर्षे झाली आहेत. त्यानंतर पाकिस्तान सातत्याने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत आहे. काश्मीरप्रश्नाबाबत जगातील इतर देश पाठिंबा देतील किंवा न देतील, पण चीन नक्कीच देईल, अशी पाकिस्तानला आशा आहे. भारत आणि पाकिस्तानने चर्चा करून काश्मीर प्रश्न शांततेने सोडवावा, असे आवाहन चीनने केले आहे.
मैदानात भारतीय राष्ट्रगीत सुरू होताच भावुक झाली ‘गोल्डन गर्ल’ साक्षी मलिक
बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. शुक्रवारचा (५ ऑगस्ट) दिवस भारतीय कुस्तीगीरांनी गाजवला. त्यांनी भारताच्या पदकसंख्येत चार पदकांची मोलाची भर घातली. ऑलिंपिक पदक विजेत्या बजरंग पुनिया(६५ किलो), दीपक पुनिया (८६ किलो) आणि साक्षी मलिक (६२ किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले तर, अंशु मलिकला (५७ किलो) रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. साक्षी मलिकने आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखून सुवर्णपदक जिंकले. मात्र, पदक जिंकूनही तिला मैदानातच अश्रू अनावर झाले
बीडचे मठाधिपती खाडे महाराज वादाच्या भोवऱ्यात, महिलेच्या तक्रारीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल
बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथील श्री क्षेत्र हनुमानगडचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा पोलीस ठाण्यात एका 29 वर्षीय महिलेने बलात्कार केल्याची तक्रार दिलीय. विशेष म्हणजे महिलेच्या तक्रारीआधी मठाधिपतींनी सुद्धा मारहाण करून धमकावल्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा नोंदविला होता. यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई एअरपोर्टवर पकडले 11 कोटींचे हेरॉईन ; कॅप्सूल निघाले पोटातून
हेरॉईन तस्करीप्रकरणी अंगोलाच्या एका नागरिकाला मुंबईत अटक करण्यात आली. अटक केलेला अंगोलन नागरिक पोटात लपवून हेरॉइनची तस्करी करत होता. त्याच्याकडून सीमाशुल्क विभागाने दीड किलो हेरॉईन जप्त केले आहे. जप्त केलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारानुसार किंमत 10.45 कोटी एवढी आहे. गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर या व्यक्तीला अटक करण्यात आली.
पंजाबमध्ये माकडांची प्रचंड दहशत, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पालकांची विचित्र कसरत
पंजाबमधल्या संगरूरमधल्या आमलपूर गावातले पालक मुलांना शाळेत सोडताना आणि परत मुलांना घरी घेऊन जाताना आपल्या हातामध्ये आवर्जून मोठी काठी ठेवतात. इतकंच नाही, तर या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांनाही हातात काठी घेऊनच शाळेत प्रवेश करावा लागतो. ही गोष्ट आश्चर्यकारक असली तरी खरी आहे.या गावामध्ये माकडांची मोठी दहशत आहे. माकडांच्या दहशतीमुळे ग्रामस्थ एकटे घराबाहेर पडण्यास घाबरतात. माकडं लहान मुलांवर हल्ला करतील, अशी भीती पालक आणि शिक्षकांना नेहमीच वाटते.
बडा नेता ईडीच्या कैदेत, बंगालच्या मुख्यमंत्र्यांची मोदींना भेट, ममता दिदींचे हात दगडाखाली की आणखी काय?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ममता दिदी आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीचा फोटो शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ममता आणि मोदी यांच्या या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण ममता बॅनर्जी या भाजपच्या निंदक आहेत. त्यांचं आणि भाजपचं अजिबात जमत नाही. पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात रणशिंग फुंकण्यासाठी ममता बॅनर्जी संपूर्ण देशभरात विरोधाकांना एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ममता यांनी अनेकदा मोदींची भेट घेणं टाळलं आहे. असं असताना आज अचानक ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा फोटो समोर आल्याने देशाच्या राजकारणात नेमकं काय सुरुय? अशी चर्चा सुरु झाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील एका बड्या नेत्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर या सगळ्या घडामोडी घडत आहेत, अशी देखील चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. या सगळ्या घडामोडी आता देशाला पुढच्या काही दिवसांमध्ये नवी राजकीय समीकरणं दाखवतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
कर्जाच्या हप्त्यात पुन्हा होणार वाढ; RBI कडून रेपो दरात अर्धा टक्क्यांची वाढ
सतत वाढत चाललेल्या महागाईमुळे रिझर्व्ह बँकेने गुरुवारी पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. आता रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो दर 5.40 टक्के झाला आहे. मे महिन्यात रेपो दरात अनपेक्षित 40-बेसिस पॉईंट्स आणि जूनमध्ये 50 बेसिस पॉइंट्स वाढ केल्यानंतर आरबीआयने केलेली ही तिसरी वाढ आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने आपल्या घर आणि कार कर्जासारख्या इतर कर्जाच्या ईएमआयमध्ये वाढ होईल.
SD Social Media
9850 60 3590