पश्चिम बंगालमध्ये मोठा पराभव पत्करावा लागल्यानंतर भाजपने आता उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. उत्तर प्रदेशात 2022मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप नेत्यांमध्ये दिल्लीत गुप्त बैठक झाली. या बैठकीत यूपीच्या निवडणुकीच्या रणनीतीवर खलबतं झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
सुमारे दीड तास ही बैठक चालली. या बैठकीत प्रत्येक नेत्याने आपली मतं मांडली. विशेष म्हणजे या गुप्त बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संघ सरकार्यवाह दत्तात्रय होसबोले आणि राज्य संघटन मंत्री सुनील बंसल आदी उपस्थित होते. यावरून ही बैठक किती महत्त्वाची होती, याचा अंदाजा येतो.
या बैठकीत उत्तर प्रदेशातील कोरोनाच्या हाहा:कारामुळे पक्षाची मलिन झालेली प्रतिमा, त्याचा निवडणुकीवर होऊ शकणारा परिणाम आदींवर चर्चा झाली. तसेच निवडणुकीपूर्वी पक्षाची प्रतिमा कशी उंचावता येईल, यावरही चर्चा करण्यात आली.
सुनील बंसल गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीतच होते. ते सातत्याने दत्तात्रय होसबोले यांच्या संपर्कात होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आधी बंसल आणि होसबोले यांची बैठक पार पडली. त्यानंतर बंसल नड्डांना भेटले. नंतर होसबोले, शहा, नड्डा यांची मोदींशी चर्चा झाली. सरतेशेवटी शहा, नड्डा आणि मोदी यांच्यात चर्चा झाली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकीतून लोकांचा भाजपवरील विश्वास उडाल्याचं दिसून आलं आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाली.
संघ स्वयंसेवकांनी उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरणाबाबत जे फिडबॅक दिलं, त्याची माहिती होसबोले यांनी बैठकीत दिली. तसेच भविष्यात भाजपची रणनीती काय असेल त्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. भाजप आणि संघ नेत्यांमध्ये अचानक झालेल्या या बैठकीवरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.