बॉलिवूडचे ‘कॉमेडी किंग’ अभिनेते जॉनी लिव्हर (Johnny Lever) यांचा आज (14 ऑगस्ट) वाढदिवस आहे. त्यांनी आपल्या अनेक चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि अनेक वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. असं म्हणतात की, प्रत्येक यशस्वी माणसामागे एक कथा असते. त्याचप्रमाणे जॉनी लिव्हरनेही आज जे स्थान मिळवलं आहे, त्याच्या मागे एक प्रचंड मोठा संघर्ष आहे. जॉनी लिव्हर यांचे खरे नाव जॉन प्रकाश राव जनुमाला आहे.
आंध्र प्रदेशात जन्मलेल्या, जॉनी लिव्हरचे संगोपन मुंबईच्या धारावी भागात झाले. त्यांचे वडील प्रकाश राव हिंदुस्तान लीव्हरमध्ये काम करायचे आणि आई घर सांभाळायची. प्रकाश रावांना दारू पिण्याची खूप वाईट सवय होती, ज्यामुळे घरात पैसे शिल्लक नव्हते. असे म्हटले जाते की जॉनी लिव्हर, घरची वाईट आर्थिक परिस्थिती आणि त्याच्या वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे त्रस्त, त्याने एकदा आत्महत्या करण्याचा विचार केला होता पण नंतर हेतू बदलला. जॉनी जेव्हा सातव्या वर्गात शिकत होते, तेव्हा त्यांच्या घराची आर्थिक स्थिती खालावली होती, ज्यामुळे त्यांना सातवीनंतर शिक्षण सोडावे लागले. जॉनीच्या संघर्षाची कहाणी येथूनच सुरू झाली.
जॉनी लिव्हरच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली, तेव्हा त्यांनी काम करून कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला. जॉनी बॉलिवूड स्टार्सची नक्कल करत मुंबईच्या गल्ल्यांमध्ये पेन विकत असत. यासोबत ते एका कलाकाराप्रमाणे नाचायचे. नंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना हिंदुस्तान लिव्हरमध्ये काम मिळवून दिले.
हिंदुस्तान लिव्हरच्या कारखान्यात काम करताना जॉनी त्यांच्या मिमिक्री आणि कॉमेडीने लोकांना हसवायचे. बेबी तबस्मुने जॉनी यांना ‘तुम पर हम कुरबान’ चित्रपटात पहिला ब्रेक मिळवून दिला. तर, सुनील दत्त यांनी जॉनीला आपल्या ‘दर्द का रिश्ता’ चित्रपटात काम दिले. येथून त्यांच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात झाली.
‘बाजीगर’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘जुदाई’, ‘येस बॉस’, ‘इश्क’, ‘आंटी नंबर 1’, ‘दुल्हे राजा’, ‘कुछ कुछ होता है’, ‘अनारी नंबर 1’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘फिर हेरा फेरी’, ‘गोलमाल 3’, ‘गोलमाल अगेन’ आणि ‘हाऊसफुल्ल 4’ सारख्या अनेक विनोदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.
(फोटो क्रेडिट गुगल)