एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ 30 जूनला घेतली, त्यानंतर अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. फक्त दोनच मंत्री राज्याचा कारभार हाकत असल्यामुळे विरोधक सतत सरकारवर टीका करत आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये सरकारच्या अस्तित्वाबाबतची सुनावणी सुरू असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचा दावाही विरोधक करत आहेत, पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 29 जुलैच्या आधी मंत्रिमंडळ जाहीर होईल. मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार असल्याचं सत्तार म्हणाले आहेत. तसंच मी नेहमी खूश असतो, मंत्रिमंडळ यादीत नाव असो किंवा नसो. कारण मी उधारीवर धंदा करत नाही. मैने नगद बेचा मुझे टेन्शन नही, असं उत्तर सत्तार यांनी मंत्रीपदी तुमची वर्णी लागणार का, या प्रश्नावर दिलं.
आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीची दारं गेलेल्या आमदारांसाठी अजूनही उघडी असल्याचं वक्तव्य केलं होतं, त्यावरही सत्तार बोलले. मातोश्रीची दारं उघडी असली तरी मी आता परत जाणार नाही, असं सत्तार यांनी सांगितलं. तसंच आदित्य ठाकरेंच्या शक्तीप्रदर्शनाला 31 जुलैला उत्तर देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 31 तारखेला सिल्लोडमध्ये येणार असल्याचं सत्तार यांनी जाहीर केलं.