आज दि.१ आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

जगातील पहिलं इलेक्ट्रिक विमान ‘अ‍ॅलिस’चं उड्डाण यशस्वी

जगभरात दळण-वळणाच्या साधनांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर करून विविध कंपन्या इलेक्ट्रिक कार, बाईक, ऑटो, बसेसची निर्मिती करत आहेत. आता या यादीमध्ये विमानही समाविष्ट झालंय. जगातील पहिल्या इलेक्ट्रिक विमानाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘अ‍ॅलिस’ असं या विमानाचं नाव आहे. जगातील पहिले इलेक्ट्रिक विमान अ‍ॅलिसने यशस्वीपणे उड्डाण केलंय.

अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये असलेल्या ग्रँट काउंटी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अ‍ॅलिस विमानाने यशस्वी उड्डाण केलं आणि सुमारे 8 मिनिटं ते हवेत उडत होतं. त्यानंतर त्याने अगदी सहजरित्या लँडिंग केलं. या विमानाने यशस्वी उड्डाण केल्यानंतर एक इतिहास रचला गेलाय. हा इतिहास इस्रायली कंपनी ईव्हिएशन एअरक्राफ्टने रचला आहे. या विमानाची अनेक वैशिष्ट्यं आहेत आणि ते विमान दिसायलाही खूप सुंदर आहे. 

आता ॲपमधूनच होणार विहीर, बोअरवेलची नोंदणी

शासनस्तरावर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाकडे जाण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. पीक विमा योजना, नुकसानभरपाई पंचनामा, शासकीय मदत किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ई-पीक पाहणी ॲप महत्त्वाचे ठरत आहे. याचसोबत आता या ॲपमध्ये शेतकरी आपल्या शेतातील विहीर, बोअरवेल, झाडांचीही नोंद करू शकणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे तलाठी कार्यालयातील हेलपाटे कमी होणार आहेत. 

अमोल कोल्हे थेट अमित शाहांच्या भेटीला, पड्यामागे खरंच काही घडतंय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमोल कोल्हे आणि अमित शाह यांच्या भेटीमागे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दुसरीकडे कोल्हे यांनी शिवप्रताप गरुडझेप या त्यांच्या चित्रपटाच्या निमित्ताने शाह यांची भेट घेतल्याचं अधिकृत कारण समोर आलं आहे. पण शाह-कोल्हे यांच्या भेटीमागे काहीतरी वेगळं राजकीय कारण तर नाही ना? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करणाऱ्याविरोधात भुजबळांचा धक्कादायक खुलासा

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. चेंबूर येथील एका व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्याने हा गुन्हा दाखल केला आहे.अखेर या प्रकरणी भुजबळ यांनी तक्रारदाराविरोधात धक्कादायक खुलासा केला आहे.धमकी दिल्याप्रकरणी छगन भुजबळ यांच्याविरोधात ललितकुमार टेकचंदानी यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबद्दल पत्रकार परिषद घेऊन भुजबळांनी खुलासा केला आहे.

युती सरकारमध्येच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

 ‘1996 च्या युती सरकारमध्येच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. यासाठी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच आमदारांचं लॉबिंग करून मागणी केली होती, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे माजी नेते आणि माजी मंत्री सुरेश नवले यांनी केला आहे. त्यांच्या या दावामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आग्रहाखातर मी मुख्यमंत्री झाल्याचा उद्धव ठाकरे वारंवार दावा करत असतात. पण, त्यांच्या या दाव्याबद्दल माजी मंत्री सुरेश नवले यांना धक्कादायक खुलासा केला आहे.

प्रेमात झाला धोका, तरुण रेल्वेवर चढला आणि हायहोल्टेज तारेला पकडलं

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमभंगातून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. रेल्वेवर चढून त्याने विद्युत तारांना स्पर्श करत आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर त्याला ससून रुग्णालयात दाखल केलं आहे. तसेच त्याच्यावर उपचार सुरू आहेत.रेल्वेच्या डब्यावर चढून एका तरुणाने हाय व्होल्टेज विद्युत तारांना हात लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हात लावल्यामुळे हा तरुण जळाला. पुणे रेल्वे स्थानकावर आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली. विद्युत तारांना स्पर्श केल्याने त्याच्या संपूर्ण शरीराभोवती आगीचे लाटा होत्या. ही घटना सकाळी घडली. यात हा यात तरुण 70 ते 80 टक्के भाजला आहे. प्रेम भंगातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करेल- पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीमध्ये 5G सेवेचा शुभारंभ केला. या सेवेमुळे सुपरफास्ट स्पीड मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांपासून ते देशाच्या सुरक्षेपर्यंत अनेक गोष्टी सुपरफास्ट होतील. गाव आणि शहर यातील अंतर कमी होईल. नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. एक नाही तर असे अनेक फायदे भारताला आणि सर्वसामान्य लोकांना होणार आहे.

या शुभारंभात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. डिजिटल इंडियाने प्रत्येक नागरिकाला स्थान दिले आहे. अगदी लहान रस्त्यावरील विक्रेते देखील UPI ची सुविधा वापरत आहेत. सरकारने मध्यस्थांशिवाय नागरिकांपर्यंत थेट पैसे पोहोचवले. तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील प्रगतीमुळे भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करेल अशी आशा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे.

सरकारी शाळेत दरवाजा बंद करुन विद्यार्थ्यांना बळजबरीने टोचली लस, 50 मुलांची झाली अशी अवस्था

उत्तरप्रदेशातील अलिगढ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी आरोग्य विभाग आणि शाळा प्रशासनाचा मोठे निष्काळजीपणा समोर आला आहे. शाळेचे गेट बंद केल्यानंतर सरकारी शाळेत शिकणाऱ्या सुमारे 150 मुलांना जबरदस्तीने लस देण्यात आल्याचा प्रकार याठिकाणी घडला. लसीच्या डोसनंतर, 50 हून अधिक मुलांची प्रकृती खालावली. यानंतर त्यांना तातडीने स्थानिक सीएससीमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

टीम इंडियात येणार आणखी एक मुंबईकर, 29 मॅचमध्ये ठोकलं दहावं शतक

मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सरफराज खाननं डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आणखी एक शतक ठोकलं आहे. सध्या सुरु असलेल्या इराणी ट्रॉफीच्या सामन्यात सरफराजनं रेस्ट ऑफ इंडियाकडून खेळताना पहिल्या दिवशी नाबाद 125 धावा केल्या. हे त्याचं 43 इनिंगमधलं 10वं शतक ठरलं. या खेळीनं पुन्हा एकदा टीम इंडियात येण्यासाठी त्यानं निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे.मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सरफराज खाननं डोमेस्टिक क्रिकेटमधला फॉर्म कायम राखला आहे. रणजी ट्रॉफी फायनल, मग दुलीप ट्रॉफी फायनल आणि आता इराणी ट्रॉफीमध्येही सरफराजनं शतकी खेळी साकारली आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.