हिमाचल प्रदेशातल्या कांगडा जिल्ह्यातल्या देहरा इथला गुगल बॉय कोणत्याही प्रश्नाचं उत्तर अगदी काही सेकंदांत देतो. देहरातल्या कल्लर पंचायत क्षेत्रातल्या लछूँ गावातल्या हर्षिलचं नाव कलाम वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवलं गेलं आहे. हर्षिल पठानियाने 7 मिनिटं 15 सेकंदांत जगातल्या 150 ऐतिहासिक वास्तू अर्थात इमारतींची नावं आणि 265 जागतिक ध्वजांची नावं सांगितली आहेत. चार वर्षांचा हर्षिल पठानिया मोहालीमधल्या एसआयएस पब्लिक स्कूलमध्ये नर्सरीत शिकतो. गेल्या वर्षी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही हर्षिलचं नाव नोंदवण्यात आलं असून, त्यासाठी त्याला प्रमाणपत्रही मिळालं आहे. परिसरातले सर्व नागरिक या मुलाच्या हुशारीचं तोंडभरून कौतुक करत आहेत. त्यासोबतच अनेक जण हर्षिलचं त्याच्या घरी जाऊन अभिनंदन करत आहेत.
`हर्षिल एकपाठी आहे. या वयातही केवळ एकदा वाचून सर्व गोष्टी त्याच्या लक्षात राहतात. सामान्य ज्ञान, राष्ट्रीय चिन्हं, जगातल्या सात आश्चर्यांची नावं, वार आणि महिन्यांची नावं, ग्रहांची नावं, महासागरांची, ऐतिहासिक वास्तूंची, देशातल्या सर्व राज्यांच्या राजधान्यांची नावं तो अचूक सांगतो. तसंच केंद्रशासित प्रदेशांची नावं, इंटरनेट लोगो, 185 देशांच्या राजधान्या, 195 देशांचे ध्वज, 31 बेटांचे ध्वज, कार कंपन्यांचे लोगो, भारतासह जगाचा नकाशा तो अचूकपणे ओळखतो. त्याला भारताचा नकाशा पूर्ण समजतो. तसंच देशातली सर्व राज्यं आणि त्यांच्या राजधान्या त्याच्या तोंडपाठ आहेत,` असं हर्षिलचे आई-वडील अंकुश आणि रिशू परमार यांनी सांगितलं.
वडील करतात खासगी कंपनीत नोकरी
हर्षिलचे वडील अंकुश पठानिया यांनी त्याच्या यशाचं सर्व श्रेय त्याची आई रिशू परमार यांना दिलं आहे. ते म्हणाले, `आमच्या मुलानं अगदी लहान वयातच जागतिक स्तरावर ठसा उमटवला याचा आम्हाला आनंद आहे. मी चंडीगडमध्ये एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्यामुळे हर्षिलला मी जास्त वेळ देऊ शकत नाही. तो त्याच्या आईसोबत जास्त वेळ असतो. त्याची आई त्याला या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी मदत करते.