कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवावर लादलेले निर्बंध शिथील करावेत. अन्यथा ठाण्यातील पालिका मुख्यालयासमोर महाआरती करुन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने दिला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जारी करण्यात आली होती. त्यामध्ये गणेशमूर्तीच्या उंचीपासून अनेक गोष्टींवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या.
याच नियमावलीवर ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या नियमावलीचा पुनर्विचार करावा. तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने केली. असं झालं नाही तर मुख्यमंत्र्यांपर्यंत भावना पोहचवण्यासाठी येत्या मंगळवारी ठाणे महापालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा समितीने दिला आहे.
तसेच मूर्तीची उंची , देखावा, धार्मिक कार्यक्रम, आगमन व विसर्जन मिरवणूक यासारख्या मुद्यांबाबतही समनव्य समितीकडून सूचना मांडण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्व गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या नियमामध्ये शिथिलता द्यावी. असे ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने सांगितले आहे.