राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर बंडातात्या कराडकर यांच्या समर्थकांनी संकल्प गार्डन बाहेर जमायला सुरुवात झाली. तसेच स्थानिक आमदार महेश लांडगे हेदेखील त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे. सध्या मंगल कार्यालयाबाहेर काही समर्थक ठिय्या देऊन बसले आहेत. ते भजन गात आहेत. यावर आता पोलीस प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारने आषाढी वारी सोहळ्यावर निर्बंध घातले आहेत. केवळ मानाच्या पालख्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. वाखरीपासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत प्रतिकात्मक पायी वारी काढली जाणार आहे. मात्र, सामान्य वारकऱ्यांना मात्र पायी वारीस मज्जाव करण्यात आला आहे.
मात्र, सरकारचा हा आदेश झुगारून बंडातात्या कराडकर शुक्रवारी आळंदीत दाखल झाले होते. याठिकाणहून त्यांनी पायी वारीला सुरुवात केली होती. सर्व वारकऱ्यांनी आळंदी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
वारकरी आळंदी पंढरपूर चालत येणारच, असा एल्गार बंडातात्या कराडकर यांनी केला होता. याआधी संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी सर्व वारकऱ्यांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलनदेखील केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असून मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये वारी सोहळा पार पडणार आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे हा सोहळा पार पडणार आहे. मात्र, आता पुन्हा एकदा बंडातात्या कराडकर यांनी वारकरी आळंदी ते पंढरपूर चालत येणारच, असे म्हटले होते.