एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेनंतर आता काँग्रेसलाही धक्का दिला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी राजीनामा देत कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. सावंत यांनी मुंबईच्या दहिसर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. अरुण सावंत यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला लागलेली गळती अजून सुरूच आहे. शिंदे यांनी सगळ्यात पहिले शिवसेनेच्या 55 पैकी 40 आमदारांना फोडलं, ज्यामुळे महाविकासआघाडी सरकार पडलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर शिवसेनेच्या 19 पैकी 12 खासदारांनीही शिंदे गटात सहभाग नोंदवला. आमदार खासदारांप्रमाणेच शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारीदेखील शिंदेंना पाठिंबा देत आहेत.
राष्ट्रवादीलाही खिंडार?
शिवसेना-काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीलाही खिंडार पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचं समोर आलं आहे. दिल्लीमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राजन पाटील हे माजी आमदार आहेत. तर, बबनदादा शिंदे हे माढा मतदारसंघाचे आमदार आहेत.