मराठीतील जेष्ठ अभिनेते अशोक सराफ हे मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. ते त्यांच्या विनोदी पात्रांसाठी खूप प्रसिद्ध आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांना अशोक मामा म्हणून देखील ओळखले जाते. अशोक सराफ यांचा कॉमिक टायमिंग इतकी जबरदस्त आहे की, ते बऱ्याच काळापासून विनोदी भूमिका साकारत असूनही, प्रत्येक भूमिकेत आणि विनोदात त्यांची वेगळी शैली दिसून येते. अशोक सराफ यांचे बालपण दक्षिण मुंबईत गेले. त्यांनी आपला अभ्यास संपवून नोकरी करावी अशी, अशोक सराफ यांच्या वडिलांची इच्छा होती, पण अशोक यांचे स्वप्न काही वेगळेच होते.
वडिलांच्या स्वप्नासाठी अशोक यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली असली तरी त्यांनी जवळपास 10 वर्षे ही नोकरी केली. काम करत असतानाही अभिनयाचे स्वप्न त्याच्या डोळ्यांत जिवंत राहिले. याच कारणामुळे ते नोकरी सांभाळत नाटकांमध्ये देखील भाग घेत होते.
अशोक सराफ 1969 पासून चित्रपट आणि टीव्ही उद्योगात कार्यरत आहेत. त्यांनी 250 हून अधिक मराठी चित्रपटांत काम केले आहे. त्यापैकी 100पेक्षा जास्त चित्रपट व्यावसायिकदृष्ट्याहे सुपरडूपर हिट ठरले आहेत. अशोक सराफ यांनी वयाच्या 18व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी ‘एक डाव भूताचा’, ‘धूम धडाका’ आणि ‘गंमत जम्मत’सारख्या हिट मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना हसवले. बॉलिवूडमध्ये त्यांनी ‘करण-अर्जुन’, ‘येस बॉस’ आणि ‘सिंघम’सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
27-28 वर्षांपूर्वी अशोक सराफ यांच्या गाडीला मोठा अपघात झाला होता आणि ते या अपघातात थोडक्यात बचावले होते. मात्र, त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्यांना 6 महिने विश्रांती घेण्यास सांगितले गेले होते. त्यानंतर 2012 साली त्यांचा पुणे एक्सप्रेस वेमध्ये दुसरा अपघात झाला. या अपघातातही अशोक सराफ मृत्यूला हरवून परत आले.
अशोक सराफ यांनी अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफशी लग्न केले, ज्या त्यांच्यापेक्षा 18 वर्षांनी लहान आहेत. दोघांच्या वयातील अंतरांबद्दल बरेच प्रश्न उपस्थित केले गेले, परंतु अशोक आणि निवेदिता यांनी त्यांच्या नात्याच्या मध्ये हे वयाचे अंतर कधीच येऊ दिले नाही. अशोक सराफ आणि निवेदिता यांना अनिकेत सराफ नावाचा मुलगा असून, तो एक पेस्ट्री शेफ आहे.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सध्या चित्रपट आणि प्रसिद्धी विश्वापासून दूर राहत आहेत. 2011 मध्ये अजय देवगणच्या ‘सिंघम’ या चित्रपटात ते शेवटचे दिसले होते. याशिवाय अशोक सराफ यांना सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणेही आवडत नाही. सध्या ते झगमगाटापासून दूर कुटुंबासोबत आपला वेळ घालवत आहेत.