औरंगाबाद महापालिकेच्या मेल्ट्रॉन या कोव्हिड रुग्णालयात कोरोना बाधित म्हणून दाखल झालेले दोन रुग्ण बोगस असल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे दहा हजार रुपयांसाठी या दोन रुग्णांनी हा बनाव केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. पालिकेने या प्रकरणात दोन दलालल, दोन बोगस रुग्ण आणि पॉझिटिव्ह आलेले दोघे अशा सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही गुन्हा नोंदवून दोन डमी रुग्णांना ताब्यात घेतले असून या रॅकेटचा शोध सुरु आहे.
सिद्धार्थ उद्यानासमोर सकाळी उस्मानपुऱ्यातील गगन पगारे व म्हाडा कॉलनीतील गौरव काथार यांची अँटिजन टेस्ट झाली. दोघे पॉझिटिव्ह निघाले. मात्र त्यांनी तळणी (जि.जालना) येथील अलोक राठोड व अतुल सदावर्ते यांना मेल्ट्रॉन रुग्णालयात दाखल केले. हे दोघेही बीएससीचे विद्यार्थी आहेत. त्यांना सिडको परिसरातील विजय मापारी, साबळे यांनी शनिवारी दुपारी साडेतीन वाजता मेल्ट्रॉनमध्ये आणले होते.
दरम्यान, आपण कोव्हिड रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नावाने भरती झालो आहोत, हे कळल्यावर दोन्ही डमी रुग्णांचा गोंधळ उडाला. त्यांनी डिस्चार्ज करण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे मेल्ट्रॉनच्या डॉ. वैशाली मुदगडकर यांना शंका आली. त्यांनी अधिक चौकशी केली असचा सर्व प्रकार समोर आला.
अँटिजन टेस्टचा रिपोर्ट 10 मिनिटात येतो. रिपोर्ट येईपर्यंत रुग्णाला बाहेर जाऊ दिले जात नाही. मग गगन पगारे व गौरव काथार यांच्या जागी अमोल आणि अतुल कसे आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांच्या जागी इतर दोघांना पाठवणारे खरे रुग्ण गावभर फिरून कोरोना पसरवत असतील का, या विचाराने महापालिकेची चिंता वाढली आहे.
एजंट मापारी आणि साबळे यांनी अलोक राठोड व अतुल सदावर्ते यांना खऱ्या रुग्णांच्या जागी भरती होण्यासाठी अमिष दाखवले होते. रुग्णालयात 10 दिवस रहा, बाहेर येताच 10 हजार रुपये दिले जातील, असे त्यांना सांगण्यात आले होते, असे चौकशीअंती समोर आले आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांऐवजी कोरोना न झालेले रुग्ण पाठवणारे रॅकेट यात सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे. आता या प्रकरणाचा सखोल तपास घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.