भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यांना सुरुवात झाली असून पहिला सामना जयपूरच्या मैदानात नुकताच पार पडला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताने 5 विकेट्सने रोमहर्षक विजय मिळवला आहे. सामना तसा एका क्षणी भारताच्या पारड्यात झुकल्याचं दिसून येत होतं. पण अखेरच्या काही ओव्हर्समध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करत भारताच्या हातातून सामना खेचण्याचा प्रयत्न केला. एकावेळी भारताला अखेरच्या 3 चेंडूत 3 धावांची गरज होती. त्यावेळी पंतने चौकार खेचत भारताला सामना जिंकवला.
सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर न्यूझीलंडने 164 धावा केल्या. भारताने या धावांचा पाठलाग करताना सुरुवातीपासून चांगला खेळ दाखवला. सूर्यकुमार आणि रोहितने उत्तम खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. रोहितने 36 चेंडूक 48 धावा केल्या. तर सूर्यकुमारने सर्वाधिक 40 चेंडूत 62 धावा केल्या. पण सूर्या बाद होताच श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर दोघेही बाद झाले. ज्यानंतर पंतने अखेरच्या ओव्हरमध्ये 3 चेंडूत 3 धावांची गरज असताना चौकार लगावत विजय भारताच्या नावे केला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 टी20 सामने खेळवले जाणार असून यातील पहिला सामना भारताने जिंकल्याने भारत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. यानंतर पुढील दोन सामन्यानंतर भारत 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.