येत्या 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी केली जात आहे. औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महासमितीतर्फे ‘भीमोत्सव ‘ साजरा करण्यात येत आहे. उत्सवाला 10 एप्रिल पासून सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे या उत्सावासाठी कोणतीही वर्गणी न मागता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदा काही विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती महासमितीचे यंदाचे अध्यक्ष राजू शिंदे यांनी दिली. या महासमितीत सर्व पक्षांचे नेते असून संस्थापक सदस्यांमार्फत नव्या सदस्यांची निवड होईल, असे सांगण्यात आले.
10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपासून क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करून अभिवादन करण्यात येईल.
शहरात निळे व पंचशील ध्वज लावण्यात येतील व बाबासाहेबांचे विचार असलेले बॅनर शहरात ठिकठिकाणी लावण्यात येतील.
11 एप्रिल रोजी लेणी, बुद्ध विहार व मिलिंद परिसरात 131 बोधीवृक्षांचे रोपण करण्यात येईल.
कमलेश चांदणे, आनंद लोखंडे, विशाल दाभाडे, विजय वाहूळ हे या प्रकल्पाचे संयोजक असतील.
12 एप्रिल रोजी सायंकाळी छावणीतील बंगला नंबर 9 येथे भीमगीतांचा कार्यक्रम होईल.
1945 ते 1956 या कालावधीत औरंगाबादला आल्यानंतर बाबासाहेबांचे वास्तव्य या बंगल्यात असे. त्यामुळे हा बंगला राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राजू शिंदे यांनी यावेळी केली.
13 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता क्रांती चौकातून शिवराय ते भीमराय या भीमज्योतीचे आयोजन करण्यात आले आहे.
भडकल गेट येथे रात्री दीपोत्साव साजरा करून रात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात येईल.
14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता भडकल गेट येथे अभिवादन, आंबेडकरी चळवळीत योगदान देणाऱ्या ज्येष्ठांचा सन्मान, तसेच उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा सन्मान महासमितीच्या वतीने करण्यात येईल. क्रांती चौकात स्टेज टाकून भीमरथांचे स्वागत करण्यात येईल.