वर्धाच्या कदम हॉस्पिटल परिसरात
अर्भकांच्या ११ कवट्या आढळल्या
वर्धा जिल्ह्यात आर्वीच्या कदम हॉस्पिटल परिसरात अर्भकांच्या ११ कवट्या आणि ५२ हाडं आढळल्याने एकच खळबळ उडालीय. पोलिसांनी एका खड्ड्यात सापडलेली ही अर्भकांची हाडं आणि कवट्या पुढील तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठवली आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर सखोल चौकशी करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. ४ दिवसांपूर्वी आर्वीतील डॉ. रेखा कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला.
राज्यात पुन्हा लसीचा तुटवडा,
केंद्राकडे केली मागणी
गेल्या २४ तासांत राज्यात करोनाचे ४६ हजार ७२३ नवे रुग्ण आढळल़े तर एकट्या मुंबईत दिवसभरात १६ हजार ४२० नवे रुग्ण आढळले. रुग्णसंख्येतील वाढ कायम असल्याने जास्तीत जास्त लसीकरण करण्याकडे राज्य सरकारचा कल आहे. पात्र लोकसंख्येला शक्य तितक्या लवकर करोना डोस देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच लसीचा तुटवडा असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आजपर्यंत राज्यात करोनामुळे
२६५ पोलिसांचा मृत्यू
राज्याच्या पोलीस विभागासही करोनाने विळखा दिल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलातील माहिती देखील समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार आजपर्यंत राज्यात करोनामुळे २६५ पोलिसांचा मृत्यू झालेला आहे. तर, यात मुंबई पोलिसांमध्ये सर्वाधित १२६ पोलिसांच्या मृत्यूची नोंद आहे. सध्या राज्य पोलिस दलात करोनाच्या २ हजार १४५ अॕक्टिव्ह केसेस आहेत.
राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे
नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत
राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक आहे.
पुण्यातील प्रसिद्ध सवाई
गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द
पुण्यातील प्रसिद्ध सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. परिस्थितीनुसार वेळोवेळी बदलण्यात येत असलेली नियमावलीमुळे अनिश्चितता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर येत्या २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेला ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली.
संक्रांतीनिमित्त एक कोटी पेक्षा
जास्त लोक सूर्यनमस्कार करतील
१४ जानेवारी रोजी मकर संक्रांती आहे. या निमित्ताने एक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात १ कोटींपेक्षा जास्त लोक योगासन करताना दिसतील, अशी आशा आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केली आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ उत्सवांतर्गत १४ जानेवारी रोजी संक्रांतीच्या दिवशी होणाऱ्या जागतिक सूर्यनमस्कार कार्यक्रमासाठी आयुष मंत्रालयाने सर्व तयारी केली आहे, असे ते म्हणाले
मोठ्या लोकांना अकलेचे
धडे मिळाले असतील : नारायण राणे
नारायण राणेंनी यावेळी निवडून आलेले मनीष दळवी आणि अतुल काळसेकर यांचं अभिनंदन करतानाच विरोधकांवर निशाणा साधला. “११-७ ने आपण त्यांचा पराभव केला आहे. जिल्ह्यात मोठमोठी लोकं आली. फार काही बोलली. ही लोकं अक्कल सांगायला इथे आली होती. आज त्यांना अकलेचे धडे मिळाले असतील”, असं राणे म्हणाले आहेत. राणेंचा इशारा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने असल्याचं बोललं जात आहे.
रुग्णालयाच्या नियमाप्रमाणे लता दीदींना
भेटण्याची परवानगी नाही : आशा भोसले
गायिका आशा भोसले यांनी बहीण लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. इ-टाइम्सशी बोलताना आशा भोसले म्हणाल्या, ‘रुग्णालयानं ठरवून दिलेल्या वेळाप्रत्रकाप्रमाणे लतादीदींना औषधं दिली जात आहेत. पण रुग्णालयाच्या नियमाप्रमाणे दीदींना भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मी त्यांना भेटण्यासाठी गेले होते पण त्यांनी मला भेटण्याची परवानगी दिली नाही. करोनाचं संक्रमण पाहता रुग्णालयाकडून नियमांच पालन केलं जात आहे.’
दाऊद इब्राहिम कासकरचा
पुतण्या सोहेल कासकर फरार
तीन वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये अटक करण्यात आलेला दाऊद इब्राहिम कासकरचा पुतण्या सोहेल कासकर हा आता फरार झाल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सोहेल कासकरला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. भारतीय तपास यंत्रणा, मुंबई पोलीस यासाठी अमेरिकेतील तपास यंत्रणांच्या संपर्कात होते. मात्र, त्यानंतर देखील सोहेल कासकर फरार झाला असून तो दुबईमार्गे पाकिस्तानमध्ये जाऊन पोहोचल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
भारताकडून जसप्रीत बुमराहने
तिखट मारा करत ५ बळी टिपले
केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेली तिसरी आणि निर्णायक कसोटी अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचली आहे. भारताने दुसऱ्या डावात आज २ बाद ५७ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावांवर आटोपला. कीगन पीटरसनने झुंजार फलंदाजी करत ७२ धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराहने तिखट मारा करत ५ बळी टिपले.
चलनी नोटा कोरोनाच्या
‘सुपर स्प्रेडर‘ कॅट’चे पत्र
चलनी नोटांतून कोरोना विषाणूंच्या प्रसाराची शक्यता पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) केंद्र सरकारला स्पष्टीकरण मागविले आहे. केंद्र सरकारने अद्याप स्पष्ट भूमिका न घेतल्याबद्दल कॅटने खेद व्यक्त केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया आणि आयसीएमआरचे अध्यक्ष डॉ. बलराम भार्गव यांच्याकडे चलनी नोटांतून होणाऱ्या विषाणूंच्या प्रसाराविषयी मत मागितले आहे. चलनी नोटांवर विषाणुविषयी केंद्र सरकारच्या स्पष्टीकरणाची मागणी सातत्याने केली जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील 22 हजार
आरोग्य कर्मचारी दुसऱ्या डोस विनाच
नाशिक जिल्ह्यातील 22 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनीच कोरोना लसीचा दुसरा डोसच घेतला नसल्याची बाब उघडकीस आली आहे. आरोग्य प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. हे पहिल्या फळीतले कर्मचारीच ऐनवेळी आजारी पडले आणि लाट तीव्र झाली, तर करायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
मालेगाव एमआयडीसीची प्रलंबित
कामे पूर्ण करण्याचे आदेश
मालेगाव ही जलदगतीने उभारण्यात आलेली विशेष एमआयडीसी (MIDC) असून, याअंतर्गत असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, असे आदेश उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. सोबतच येथील उद्योग प्रकल्प तातडीने सुरू करण्याबाबत सर्वतोपरी सहकार्य करू. उद्योग नियमावली प्रमाणे वस्त्रोद्योग पार्क व अजंग प्रकल्पांसाठी भूखंड वाटपाच्या दरास मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, असे आदेशही दिले आहेत.
मुंबईत पॉझिटिव्हीटी दर
थेट 24.3 टक्क्यांवर
मागील चार दिवसांपासून मुंबईमध्ये कोरोना (Corona) रुग्णांची संख्या कमी झाल्याचे नोंदवले गेले होते. मात्र बुधवारी या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. बुधवारी मुंईत 16420 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पाचव्या दिवशी पॉझिटिव्हीटी दर थेट 24.3% टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील कोरोना संसर्गाची स्थितीही अशीच आहे. वाढलेले हे रुग्ण मुंबईकरांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत.
(छायाचित्र – गुगल साभार )
SD social media
9850 60 35 90