कोरोना विषाणूने पुन्हा एकदा त्याचा कहर सुरू केला आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक बडे सेलिब्रिटी एकामागून एक कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. आता बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लीलावती हॉस्पिटलमध्ये अभिनेते प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी दोघांवरही डॉ.जलील पारकर यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम चोप्रा आणि त्यांच्या पत्नीने मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल घेतले असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
असेही सांगितले जात आहे की, 86 वर्षीय प्रेम चोप्रा यांचे शरीर उपचारांना खूप सकारात्मक प्रतिक्रिया देत आहे. प्रकृतीत होणारी सुधारणा पाहता एक-दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
प्रेम चोप्राच्या आधी बॉलिवूडचा हँडसम हंक अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली होती. जॉन अब्राहमने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करून स्वतः आणि पत्नीला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
जॉनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी 3 दिवसांपूर्वी एका व्यक्तीला भेटलो होतो, नंतर मला कळले की त्याला कोरोना झाला आहे. प्रिया आणि माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आम्ही घरी क्वारंटाईन झालो आहोत आणि कोणाच्याही संपर्कात आलेलो नाही. आम्ही दोघांनी लस घेतली आहे. आम्हाला सौम्य लक्षणे जाणवत आहेत. कृपया सर्वांनी निरोगी रहा आणि मास्क घाला. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे.’
नुकतेच अर्जुन कपूरसह त्याच्या कुटुंबातील अनेकांचे कोव्हिड रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. नुकतेच दिग्दर्शक, निर्माती एकता कपूरलाही कोरोनाची लागण झाली आहे. तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. एकता कपूरने इन्स्टाग्रामद्वारे ही माहिती दिली आहे.