आमची किडनी विका, पण चाळणी झालेले रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करा, अशी आर्त विनवणी जळगावकरांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे केली. तर दुसरीकडे काही सजग नागरिकांनी रस्ते दुरुस्तीसाठी कोर्टाची पायरी चढायची तयारी सुरू केली आहे.
जळगाव सोन्याची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, इथल्या रस्त्यांची दैना उडाली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरातील गणेश कॉलनी चौक, ख्वाजामिया चौक, कौर्ट चौक, चित्रा चौक, टॉवर चौक, नेरी नाका चौक, अजिंठा चौक, पिंप्राळा रेल्वे गेट, सिंधी कॉलनी, बेंडाळे चौक, पांडे चौक, इच्छादेवी चौक, शिवाजीनगर उड्डाणपूल, दूध फेडरेशन, अण्णा नगर भागातल्या रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. त्यामुळे शहवारीय हैराण झाले आहेत. त्यांनी महापालिकेकडे अनेकदा रस्ते दुरुस्तीची मागणी केली. मात्र, या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली. शेवटी वैतागलेल्या नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन केले. त्यांनी महापालिकेत धडक दिली. ‘आमची किडनी विका, त्यातून आलेल्या पैशातून रस्ते करा,’ अशी आर्त विनवणी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड यांच्याकडे केली.
काही दिवसांपूर्वी रस्ता खचून कार पलटी झाली. यात कारचालकाला दुखापत झाली. रस्त्यावरून चालताना एका ट्रॅक्टरचे चाक खराब रस्त्यांमुळे निखळले होते. त्यामुळे जळगावकरांना घराबाहेर पडायचे म्हटले, तरी अंगावर काटा येतो. इतकी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या त्रासाला कंटाळून काही सजग नागरिक कोर्टात याचिका दाखल करण्याचा पर्याय चाचपडून पहात आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मागणी करूनही रस्ते करत नाही. निदान कोर्टाच्या आदेशानंतर तरी रस्ते तयार होतील, अशी अशा या नागरिकांना आहे.
जळगावमधली रस्त्यांची चाळणी झाली आहे. अनेक भागातल्या रस्त्यांमध्ये एकेक फूट खोलीचे खड्डे आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. किरकोळ अपघात वाढले आहेत. विशेषतः नागरिकांना पाठदुखी, मणके दुखीचे विकार जडत आहेत. अनेक नोकरदारांना कामानिमित्त दिवसभर दुचाकीवर फिरावे लागते. एकीकडे नोकरी सोडता येत नाही आणि दुसरीकडे रस्त्यावरून फिरताना जीव नकोसा होतो, अशा कोंडीत ते सापडले आहेत.