भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जातोय. या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मुंबईत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंग्रजीत भाषण केलं. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर सुद्धा हा व्हिडीओ उपलब्ध आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी इंग्रजीत भाषणाला सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी मराठीत थोडं बोललेलं चालेल ना? असं विचारलं. त्यानंतर शिंदे थोडावेळ मराठीत बोलले, नंतर ते पुन्हा इंग्रजीत भाषण केलं.
“घरोघरी तिरंगा हे अभियान खूप उत्साहात आणि जल्लोषात सुरु केलं आहे. आझादी का अमृतमहोत्सवामुळे खरोखरंच राज्य आणि देशभरात देशभक्तीची मोठी लाट आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगाच्या मोहिमेमुळे प्रेरणेतून संपूर्ण देश धर्म, जात, भाषा विसरुन एक झाल्याचं चांगलं चित्र पाहायला मिळत आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, घरोघरी तिरंगा अभियानात सर्व मुंबईकरांनी सहभागी व्हावे, राष्ट्रध्वज तिरंगा आपल्या घरी फडकवताना केशरी रंगाची पट्टी वरच्या दिशेने तर हिरव्या रंगाची पट्टी खालच्या दिशेने अशा योग्य स्थितीत राष्ट्रध्वज फडकवावा, अभियान कालावधी संपल्यानंतर आपला राष्ट्रध्वज तिरंगा संस्मरणीय आठवण म्हणून आपल्या घरी जपून ठेवावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांनी केले आहे.
घरोघरी तिरंगा अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज खरेदी करुन सहभागी होण्याचे आवाहन केले होते. तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्वतः सुमारे ४० लाख राष्ट्रध्वज खरेदी केले. तर टाटा समुहाने १ लाख राष्ट्रध्वज महानगरपालिकेला दिले आहेत. असे एकूण ४१ लाख राष्ट्रध्वज तिरंगा सर्व २४ विभाग कार्यालये आणि इतर खात्यांच्या माध्यमातून मुंबईतील घरोघरी पोहोचविण्याचे कामकाज प्रशासनाने पार पाडले आहे. ४० लाख साठ्यातील सदोष आढळलेले सुमारे ४ लाख ५० राष्ट्रध्वज देखील तातडीने बदलून संबंधित पुरवठादाराकडून उपलब्ध करुन घेण्यात आले आणि ते देखील वितरित केले आहेत.