सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश निवडीची न्यायवृंद (कॉलेजियम) प्रक्रिया अपारदर्शक असल्याचे विधान सकारात्मकतेने घ्यावे आणि त्यात सुधारणेचा प्रयत्न करावा, असे नियोजित सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय विधिमंत्री किरण रिजिजू यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात न्यायवृंदाबाबत आपली मते नोंदवली होती.
न्यायवृंदाद्वारे न्यायाधीश निवडीची पद्धत अपारदर्शक आणि कुणाला जबाबदार धरणारी नसल्याचे रिजिजू म्हणाले होते. यामुळे न्यायाधीशांमध्ये भरपूर राजकारण असते, असेही त्यांचे म्हणणे होते. सरन्यायाधीश म्हणून शपथविधीच्या पूर्वसंध्येला न्या. चंद्रचूड यांनी एक्स्प्रेस समुहाला मुलाखत दिली. ‘‘आपण एका रचनेमध्ये काम करत असतानाच आपण त्यात अनेक सुधारणाही करू शकतो. घटनात्मक लोकशाहीमध्ये कोणतीच संस्था ही परिपूर्ण असल्याचा दावा करू शकत नाही. त्यामुळे ही सातत्याने विकसित होणारी यंत्रणा आहे,’’ असे ते म्हणाले.
‘‘न्यायवृंद प्रक्रिया अपारदर्शक आहे, हे पटणारे आहे. न्यायाधीशांची नियुक्ती कशी होते, हे जाणणे लोकांसाठी आवश्यक आहे. मात्र आपल्याला न्यायाधीश होण्यासाठी विचारात घेतलेल्यांची गोपनीयताही बाळगावी लागेल. अन्यथा त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेची जाहीर छाननी केली गेली तर परिणामी अनेक चांगले लोक न्यायाधीश होण्यामध्ये रस दाखवणार नाहीत,’’ असे सांगत न्या. चंद्रचूड यांनी रिजिजूंच्या टीकेला उत्तर दिले. सरन्यायाधीश झाल्यानंतर जिल्हा स्तरापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत रिक्त असलेली न्यायाधीशांची पदे भरण्यास आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी सांगितले. तसेच न्याययंत्रणेत विविधता आणण्याचे उद्दिष्टही त्यांनी अधोरेखित केले.
आज शपथविधी
देशाचे ५०वे सरन्यायाधीश म्हणून न्या. धनंजय चंद्रचूड बुधवारी शपथ घेतील. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पदाची शपथ देतील. पुढील दोन वर्षे, १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत ते या पदावर असतील. ११ ऑक्टोबर रोजी मावळते सरन्यायाधीश उदय उमेश लळित यांनी न्या. चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला केली होती. सर्वाधिक काळ सरन्यायाधीश राहिलेले न्या. वाय. व्ही. चंद्रचूड हे न्या. धनंजय चंद्रचूड यांचे वडील होत.
न्यायाधीश म्हणून निकालामध्ये लिहिलेले शब्द आणि आपले काम लक्षात घ्यावे. न्यायवृंद प्रक्रियेवर काही टीका असमर्थनीय असेल, तर काही टीकांमध्ये लक्ष घालून प्रक्रिया अधिक सुयोग्य करता येईल. मात्र सगळे बदल हे स्थैर्य राखण्यासाठी टप्प्याटप्प्याने व्हायला हवेत.
– न्या. धनंजय चंद्रचूड, नियोजित सरन्यायाधीश