स्ट्रेसमुळे आतड्यासह पचनक्रियेवरही होतो परिणाम? 

निरोगी आरोग्यासाठी आहार-विहारासोबतच मानसिक स्वास्थ्यही तितकंच महत्त्वाचं असतं. आनंदी, समाधानी वृत्ती मानसिक आरोग्यासाठी पूरक ठरतं. मात्र जीवनातील ताण-तणाव मन अस्थिर आणि अशांत करतात. त्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावरही होतो. वरवर पाहता मनाचा आणि पोटाचा तसा काही संबंध दिसत नाही. मात्र सततचा ताण आतड्यांसाठी त्रासदायक ठरतो आणि पचनक्रियेवर परिणाम करतो.

स्ट्रेस अर्थात ताणामुळे आतड्यांचं कार्य प्रभावित झालं असेल, तर या चार सोप्या टिप्सद्वारे त्यावर मात करता येऊ शकते. हेल्थलाईन डॉट कॉमनं याबाबत वृत्त दिलं आहे. आतड्यांचं कार्य व्यवस्थित सुरू असेल, तर पचन नीट होतं. यामुळे बहुतांश आजार दूर पळतात. आतड्यांवर तणावाचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे पचन क्रियाही बिघडते. ताण किती व कसा आहे, त्यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. थोड्या कालावधीसाठी ताण असेल, तर भूक, पचनक्रिया मंदावणं अशा समस्या उद्भवतात.

बऱ्याच काळापासून तणावाचा सामना करत असाल, तर बद्धकोष्ठता, डायरिया, अपचन, जळजळ, अस्वस्थता यांसारख्या गॅस्ट्रोइंटेस्टीनल समस्या उद्भवतात. हे जुनाट दुखणं असेल, तर यामुळे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम किंवा पचनाशी निगडीत इतर समस्या उद्भवतात. त्यामुळे ताण कमी करणं पोटाच्या समस्येसाठी महत्त्वाचं असतं. ताण कमी झाला, की आतड्यांवरची सूज कमी होते व शरीराला आवश्यक असणारी पोषणमूल्यं शरीरात शोषली जाण्यास मदत होते. त्यासाठी योगासनं, मेडिटेशन, प्रोबायोटिक आहार अशा गोष्टी करता येतात.

प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक आहारामुळे शरीरातील चांगले जीवाणू वाढण्यास मदत होते. यामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं. इनुलिन हा घटक असणाऱ्या शतावरी, केळं, कांदा, लसूण अशा भाज्या व फळं प्रीबायोटिक आहारात येतात. आंबवलेले पदार्थ, दही, केफिर यांसारख्या गोष्टी प्रोबायोटिक आहारात येतात. अशा आहारामुळे आतड्यातील वाईट जीवाणू कमी होतात. त्यामुळे अर्थातच चांगल्या जीवाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होतं आणि पचन क्रिया सुधारते.

पचन क्रिया सुधारण्यासाठी पुरेसा व्यायामही गरजेचा असतो. चालणं, धावणं यामुळे शरीराला व्यायाम मिळतो. त्याशिवाय हठयोग किंवा अय्यंगार योग केल्यामुळे शरीराची स्थिती, ढब सुधारण्यास मदत होते. याचा पाचन क्रिया सुधारण्यासाठी फायदा होतो. मेडिटेशन अर्थात एकाग्रता केल्यामुळे ताण कमी होण्यासाठी मदत होते, असं शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालं आहे. मेडिटेशनमुळे आपण काय करतो, कशा पद्धतीनं वागतो, खातो, पितो आणि त्यातलं काय टाळायला हवं याचं भान येतं.

मेडिटेशनबरोबरच दीर्घ श्वासोच्छवासाचा व्यायाम केल्यामुळे आतड्याच्या जखमा बऱ्या होतात. यामुळे पचन चांगलं होतं. जेवणाआधी ताठ बसून चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. दोन ते चार वेळा दीर्घ श्वसन करा. म्हणजे चार आकडे म्हणेपर्यंत श्वास आत घ्या, तितकाच वेळ श्वास रोखून धरा व तितक्याच वेळात हळूहळू श्वास नाकावाटे शरीराबाहेर सोडून द्या. प्रत्येक जेवणाआधी हे केल्यामुळे हलकं वाटेल आणि अन्न पचनासाठी शरीर तयार होईल.

ताण वाढल्यावर सिगरेट पिण्याची सवय असेल, तर ती घातक ठरू शकते. धूम्रपानामुळे हृदयरोग व श्वसनाचे आजार होतातच, पण पचनाच्या समस्याही उद्भवतात, असं संशोधन सांगतं. धूम्रपानामुळे पेप्टिक अल्सर, गॅस्ट्रोइंटेस्टीनल आजार व कर्करोगाचा धोका वाढतो. धूम्रपानाची सवय हळूहळू कमी करा व पूर्णपणे सोडून द्या. यामुळे आतड्यांच्या आरोग्याबरोबरच संपूर्ण शरीर निरोगी राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.