राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासमोर नमतं घ्यायला तयार नाही. तर राज्यातील एसटी कर्मचारीदेखील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. विविध जिल्ह्यातील विविध डेपोंतील कर्मचारी एकजुटीने आंदोलन करून आपल्या मागण्या मांडत आहेत. काही राजकीय पक्षांनीही आंदोलनाला पाठिंबा दिलाय. मात्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या आंदोलनात कर्मचाऱ्यांच्या बाजूने भूमिका घ्यावी, अशी विनंती आज शिरूर तालुक्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी केली.
शिरूर तालुक्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज 17 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. एसटीचे कर्मचारी अहमदनगर जिल्ह्यातील अण्णा हजारे यांच्या गावी अर्थात राळेगणसिद्धी येथे गेले. या ठिकाणी अण्णा हजारे यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली. अण्णा हजारे यांनीही आंदोलकांची विनंती स्वीकारली असून यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार करणार असल्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, एसटी कर्मचारी संपाला पाठिंबा देण्यासाठी जामखेड येथे वंचित बहुजन रस्त्यावर उतरली आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी सहकुटुंब आक्रोश मोर्चा काढला. जामखेड शहरातून या मागणीसाठी भव्य मोर्चा काढून तो तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला. या मोर्चात महिला, लहान मुले आणि वृद्धांचा सहभाग होता. टाळ-मृदुंगाच्या गजरात भजन गाऊन त्यांनी सरकारचा निषेध नोंदवला.