राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालीय. यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी लढत कोल्हापूरच्या जागेची आहे. कारण, विकास आघाडीकडून गृहराज्यमंत्री सतेज पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीचे नेते अर्ज दाखल करताना उपस्थित राहणार आहेत. तर, भाजपकडून अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यात येणार असल्यानं विधान परिषद निवडणुकीत रंगत आलीय.
राष्ट्रवादी आणि सेनेचे मंत्री उपस्थित राहणार
गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आज कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हा परिषदेतील महा विकास आघाडीच्या सदस्यांचा मेळावा होणार आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 421 मतदार आहेत. यातील पाच जण मयत असल्याने 416 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. भाजपकडे सध्या कोरे आणि आवाडे गटाला एकत्र करत 160 मत आहेत. तर, महाविकास आघाडी कडे जवळपास 250 मत आहेत. म्हणजेच विजयासाठी भाजपला आणखी 50 ते 60 मतांची गोळाबेरीज करावी लागणार आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान होणार आहे. सतेज पाटील विरुद्ध महाडिक एक पारंपारिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमने-सामने आलेत. महा विकास आघाडीकडून राज्यमंत्री सतेज पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं होम ग्राऊंड असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील या जागेसाठी भाजपनं देखील अमल महाडिक यांना उमेदवारी देत कंबर कसली आहे.